दोन तास वाढीव परवानगीबाबत व्यापार्‍यांमध्ये संभ्रम
सार्वमत

दोन तास वाढीव परवानगीबाबत व्यापार्‍यांमध्ये संभ्रम

जिल्हा प्रशासनाकडून खुलासा होईना

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य शासनाने दि. 9 जुलैपासून परवानगी दिलेली असताना श्रीरामपूर शहरात मात्र या आदेशाबाबत संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.

काल श्रीरामपूर तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेश येत नाही तोपर्यंत दुकाने 9 ते 5 या वेळेतच उघडावीत असे सांगितल्यामुळे व्यापार्‍यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’ टप्पा 5 अंतर्गत यासंदर्भातील आदेश निर्गमित केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य शासनाच्या महासंवाद या अधिकृत पोर्टलवरही सदरचे आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत.

या नगरपालिका परिसरातील कंटेन्मेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील 7 दिवस परवानगी देण्यात येत आहे. दुकानांना पी वन पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे.

सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधित दुकाने किंवा मार्केट बंद करेल. मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधित मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, असे या आदेशात म्हटले आहे.

राज्य शासनाने दुकानांसाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंतची वाढीव वेळ दिलेली असताना श्रीरामपुरात दुकाने कोणत्या वेळेस उघडायची याबाबत कारवाईच्या भितीने संभ्रम आहे. अनेकांनी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे या दुकानांच्या वाढीव वेळेबाबत जिल्हाधिकार्‍यांकडून खुलासा होत नसल्यामुळे अनेकजण संभ्रमातच आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com