लग्न मोडल्याच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादी दाखल; राजापूर येथील घटना
लग्न मोडल्याच्या कारणावरुन दोन गटांत हाणामारी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मुलाचे जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार्‍यास विचारणा करण्यासाठी गेलेल्या मामाला गजाने बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील राजापूर येथे काल सकाळी 11 वाजता घडली. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्पर विरोधी फिर्यादीवरून मुलाकडील 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंदा भाऊसाहेब गडाख (रा. मुरावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या मुलाचे लग्न जमले होते. मात्र युवराज मधुकर खतोडे (रा. राजापूर, ता. संगमनेर) याने मुलीच्या घरच्यांना एकाचे दोन सांगून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून फिर्यादी महिला व तिचा भाऊ लहानु शंकर काळे (रा. देवठाण) हे काल सकाळी 11 वाजता ब्रिझा कारने राजापूर येथे गेले. विचारणा करत असताना युवराज खतोडे, सोमनाथ मधुकर खतोडे, सुवर्णा सोमनाथ खतोडे, युवराज खतोडे याची पत्नी, सुजल सोमनाथ खतोडे, मधुकर बापुराव खतोडे, (सर्व रा. राजापूर, ता. संगमनेर) व जालिंदर दशरथ गडाख (रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी संगनमताने येऊन ब्रिझा कार अडवून दगडफेक करून तिचे नुकसान केले. तसेच तुम्ही पुण्याहून आम्हाला मारायला आले का? असे म्हणून फिर्यादीचा भाऊ लहानू शंकर काळे याचे डोक्यात गज मारून साक्षीदार यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून दम दिला. जखमी लहानू काळे यास संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सदर फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 298/2022 भारतीय दंड संहिता 143, 147, 148, 341, 337, 326, 323, 504, 506, 427 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करत आहे.

तर परस्पर विरोधी फिर्यादीत युवराज मधुकर खतोडे याने म्हटले आहे की, भाऊसाहेब दशरख गडाख हे त्यांच्या मुलाचे जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो याचा संशय घेवून त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ब्रिझा कारमधून येऊन फिर्यादीच्या वडिलांना मारहाण करुन पुतण्या शिवराज याच्या डोक्यात टामी मारून जखमी केले. तसेच लग्न मोडल्यामुळे आमचा खर्च झाला असे म्हणून फिर्यादीची पत्नी व भाऊजयी यांचे अंगावरील मंगळसूत्र ओडून घेऊन यातील एका महिलेने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर मिरची पावडर फेकून मारहाण व शिवीगाळ दमदाटी केली. यामध्ये युवराज खतोडे, मधुकर खतोडे, शिवराज खतोडे, सुवर्णा खतोडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी भाऊसाहेब गडाख, मंदा भाऊसाहेब गडाख, अनिकेत भाऊसाहेब गडाख, लहानु शंकर काळे, तुकाराम शंकर काळे, नवनाथ शंकर काळे, गोपीनाथ शंकर काळे (रा. देवठाण), दिपक अशोक कर्पे (रा. पिंपळगाव कोंझिरा), लहानु काळे याचा मुलगा, तुकाराम शंकर याचा मुलगा, नवनाथ शंकर याचा मुलगा, एकनाथ शंकर काळे याचा मुलगा व इतर तिन ते चार महिला यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 299/2022 भारतीय दंड संहिता 143, 147, 148, 326, 452, 327, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. धनवट करत आहेत.

Related Stories

No stories found.