सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांचे लाखोंचे नुकसान
सार्वमत

सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांचे लाखोंचे नुकसान

Arvind Arkhade

कोपरगाव|तालुका प्रतिनिधी|Kopargav

शहरासह तालुक्याला सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीचा अनेक गावांना फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे पिकविलेल्या मालाला बाजारभावही मिळत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पिके उभी केली. परंतु या पावसाने शेतातील उभी पिके लोळवली. बळीराजाचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवसांनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील सोयाबीन, मका, पेरूच्या बागा, डाळिंबाच्या बागा, कांदा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

शिंगणापूर, खर्डी गणेश, पोहेगाव, सोनेवाडी, मढी बु., चांदेकसारे, देर्डे चांदवड, देर्डे कोर्‍हाळे, हंडेवाडी, कारवाडी, वेळापूर, सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, हिंगणी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, डाऊच, धारणगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती पिकाबरोबरच घरात पाणी घुसून पडझड झाली तर विहिरींचेही नुकसान झाले.

रात्री बंद झालेल्या पावसाचे पुन्हा सकाळी आगमन झाले.सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुन्हा पावसाची शक्यता आहे. शिंगणापूर व खर्डी गणेश येथील चंद्रकांत राऊत यांच्या पेरू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विलास लक्ष्मण चांदर, अनिकेत राजाराम चांदर, चंद्रभान भिकजी चांदर, पोपटराव गायकवाड, संगीता अशोक चांदर, बाबुराव विठ्ठल चांदर, राऊत शूलकेश्वर नारायण, संजय राऊत, राजेंद्र राऊत, चंद्रकांत राऊत याचे मका व सोयाबीन या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. पिकांचे पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com