Corona
Corona
सार्वमत

लोणी बुद्रुकमध्ये एका दिवसात आढळले तीन करोना बाधित

22 व्यक्ती क्वारंटाईन; परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Nilesh Jadhav

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाणारे लोणी बुद्रुक गावात बुधवारी तिघे जण करोना बाधित आढळले. राहाता तहसीलदारांनी रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

लोणी बुद्रुक गावालगतची चंद्रापूर, हसनापूर, दाढ बुद्रुक ही गावे काही दिवसांपासून लॉकडाऊन आहेत. लोणीतही दोन महिन्यांपूर्वी एक व्यक्ती बाधित आढळला होता. त्यानंतर प्रशासन आणि ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजनांमुळे येथे संसर्ग झाला नव्हता.

गुरुवारी लोणीतील भारतीय स्टेट बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेली महिला करोना बाधित आढळून आली. त्यांचे पती अहमदनगर येथे एका सरकारी बँकेत नोकरीला आहेत. ते गेल्या आठ दिवसांपासून आजारी होते. खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून ते लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथून त्यांना प्रवरेच्या कोव्हिड सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवले असता त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

पतीला संसर्ग झाल्याने पत्नीनेही तपासणी केली असता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या घरातील दोन मुले, एक महिला, शेजारची एक व्यक्ती आणि बँकेतील सोळा कर्मचार्‍यांना प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. प्रवरा रुग्णालयातील एका परिचारिकेचा मुलगा बुधवारी पुण्याहून लोणीत आला. प्रवरा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती बाहेरच्या जिल्ह्यातून आल्यास त्यांची करोना चाचणी करण्याचे धोरण घेतले आहे.

त्यानुसार काल या तरुणाची चाचणी घेण्यात आल्यावर तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्या कुटुंबातील इतरांना क्वारंटाईन करण्यात आले. हे तिन्ही रुग्ण पद्मश्रीनगर व स्वामी समर्थ केंद्रामागील वसाहतीत राहणारे असल्याने प्रशासनाने पद्मश्री नगर, शेलकर वस्ती परिसर, स्वामी समर्थ केंद्र रस्ता हा भाग राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून या भागातील सर्व व्यवहार आणि लोकांची ये-जा 21 जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांनी सांगितले की, या भागातील प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली असून आरोग्य विभागाने सर्व आवश्यक सेवा सुरू केल्या आहेत.

काल 22 व्यक्तींना प्रवरा कोव्हिड सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची शोध घेण्यात येत आहे. पुण्याहून आलेल्या तरुणाला आणण्यासाठी लोणीतील एक तरुण गेला होता. त्याचा शोध प्रशासनाने घेतला असून तो कुटुंबासह ठाण्याला गेल्याचे समजते. तर दुसरा बाधित बँक अधिकारी आश्वी येथे उपचार घेऊन आल्याने आता तेथील काहींना प्रशासनाकडून क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com