जामखेड शहरात तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर करोनाचा धुमाकूळ
सार्वमत

जामखेड शहरात तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर करोनाचा धुमाकूळ

डॉक्टरसह तीन जण पॉझिटिव्ह; संपर्कात 60 जण

Nilesh Jadhav

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

शहरात तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एका खाजगी डॉक्टरांसह एकूण तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

शहरातील खासगी हॉस्पिटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या अजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. या नंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नगर येथील खाजगी लॅब मध्ये करोनाची तपासणी केली होती. तर शहरातील बीड रोडवर रहाणारी एक व्यक्ती आजारी आसल्याने त्या व्यक्तीने देखील नगर येथील खासगी लॅब मध्ये तपासणी केली होती.

तर तिसरा गोरोबा कुंभार टॉकीज जवळ राहत आहे. काल दि. 29 रोजी या तीनही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने फक्राबादच्या रुग्णांसह शहरातील तीन रुग्ण यांच्या संपर्कात आलेले अंदाजे 60 जणाना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी दिली आहे. या तीनही व्यक्ती जामखेड शहरात राहत आहेत.तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरात पुन्हा करोनाने एंट्री केली आहे.

तसेच काल देखील फक्राबाद येथील एक व्यक्ती व बाहेरगावी राहत असलेल्या मात्र जामखेड शहरातील स्थानिक पत्ता असलेल्या दोन अशा एकूण तीन जणांना देखील करोनाची लागण झाली होती. त्यामुळे सध्या दोन दिवसांत शहरासह तालुक्यातील एकूण सहा व्यक्ती करोना बाधित अढळून आल्या आहेत.

काल डॉक्टरांसह निघालेल्या तीन व्यक्ती सध्या नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टर हे पुण्याहून आल्यानंतर क्वांरंटाईन झाले होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे हॉस्पिटल देखील बंद होते. मात्र शहरातील जी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे, ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

सध्या लॉकडाऊनचा विचार नसला तरी नागरिकांनी जर नियम पाळले नाहीत तर मात्र कडक लॉकडाऊन करण्यात येईल असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे देखील ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com