पाण्यातून वाळू काढताना दोन बैलांचा मृत्यू

पाण्यातून वाळू काढताना दोन बैलांचा मृत्यू

राहुरी स्टेशन येथील घटना

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे खोल पाण्यातून बैलांच्या साहाय्याने वाळू बाहेर काढून वाहतूक करण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. वाळूतस्करांच्या या जीवघेण्या खेळात अनपेक्षितपणे दोन मुक्या निष्पाप बैलांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन येथील रेल्वेच्या लोखंडी पुलाजवळ अनेक वर्षांपासून बैलगाडीच्या साहाय्याने खोल पाण्यातून वाळूचा उपसा करून रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनातून वाहतूक केली जाते. महसूल विभाग तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यासाठी येतात, परंतु तात्पुरती कारवाई होऊन पुन्हा उपसा सुरू होतो. अशी परिस्थिती आहे. मात्र सदर ठिकाणी नदी पात्रातून पलीकडील बाजूने या बाजूकडे वाळू बाहेर काढताना साधारण 10 ते 12 फूट खोल पाण्यातून वाळू बाहेर काढण्याचे काम निष्पाप मुक्या बैलांना करावे लागते. यावेळी बैलांचे फक्त तोंडच बाहेर असते व पूर्ण बैलगाडी पाण्यात असते.

असेच वाळू वाहतूक करणारे मजूर नदी पात्रातून वाळू बाहेर काढत असताना अचानक पाण्यात बैलगाडी उलटली. त्यामुळे दोन्ही बैल पाण्यात बुडू लागले. दोन मजूर मात्र पाण्यातून बाहेर पडले, परंतु बैलगाड़ी पाण्यात उलटी अडकून बसल्याने व बैलांचे बैलगाडीला गळे बांधलेले असल्याने पाण्यात बुडून ते मरण पावले. सुदैवाने वाळू भरणारा मजूर बैलगाडी व बैलासोबत पाण्यात अडकला नाही. त्यामुळे निदान हा अनर्थ टळला.

उपस्थित काही युवकांनी बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी खोल असल्याने वाचवता आले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे अनेक प्राणीमित्रांनी तसेच सुज्ञ नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com