दोन भावडांना चाकू, गजाने मारहाण

तिघांविरूध्द तोफखाना पोलिसांत गुन्हा
दोन भावडांना चाकू, गजाने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना तिघांसोबत झालेल्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यात आली. दरम्यान तो वाद पोलिसांनी मिटविल्यानंतर मारहाण झालेल्या युवकाला त्याचा भाऊ घरी घेऊन जात असताना पुन्हा त्या दोघां भावांना दिल्लीगेट परिसरात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी गणेश संतोष भुजबळ (वय 21 रा. आगरकर वाडा, नालेगाव) यांनी दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. सुरज सदु पटला, निल गांधी, विवेक कांडापेल्ली (सर्व रा. झारेकर गल्ली, नगर) व इतर 10 ते 15 जणांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत फिर्यादीचा भाऊ सनी संतोष भुजबळ नाचत असताना त्याचे सुरज, निल, विवेक यांच्यासोबत वाद झाले. या वादातून तिघांनी सनीला मारहाण केली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तो वाद मिटवला.

त्यानंतर फिर्यादी तेथे आले. ते सनीला घेऊन घरी जात असताना दिल्लीगेट परिसरातील म्हस्के क्लासेस समोर रात्री साडे बारा वाजता त्यांना अडवले. ‘तुम्ही दोघे भाऊ आमच्या नादी लागायचे नाही, आम्ही नगरचे दादा आहे, आमचे नगरमध्ये कोणी नाद करत नाही’, असे म्हणून सुरज पटला याने चाकूने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. निल गांधीने लोखंडी गजाने मारहाण केली. विवेक कांडापेल्लीने सनी भुजबळ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com