
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन खानापूर येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास माळवाडगाव - खानापूर रस्त्यावर घडली.
दोन्ही मोटारसायकल स्वार खानापूर येथील आहेत. खानापूरहून माळवाडगावकडे विलासराव हरिभाऊ आदिक व वाल्मिक भास्करराव आदिक हे दोघे येत होते.तर बाळासाहेब केरू भालेराव हे माळवाडगावहून खानापूर कडे चालले होते. धडक होताच ज़ोराचा आवाज ऐकून करपे, मोरे वस्तीवरील नागरिक मदतीस धावून आले. बाळासाहेब भालेराव(वय 59) यांचा रुग्णालयात जाताना रस्त्यात तर विलासराव आदिक (वय 55) यांचा श्रीरामपूर रुग्णालयात मृत्यू झाला.
जखमी वाल्मिक आदिक यांच्यावर उपचार सुरू आहे. मयत बाळासाहेब भालेराव हे खानापूर ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते. तर विलास आदिक हे अॅड. सुभाष चौधरी (भोकर) यांचे मेहुणे व हंसराज आदिक, पोलीस पाटील संजय आदिक यांचे बंधू होत. अपघाताच्या या घटनेने खानापूर गावांवर शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात रात्री उशीराने गोदातिरी स्मशानभूमीत विलासराव आदिक यांच्यावर शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले.भालेरांव यांची मुले नोकरीस बाहेरगावी असल्याने आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे. श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.