Video : पारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट, पाहा नेमकं काय म्हणाल्या तहसीलदार देवरे

माझ्या विरोधातील कर्मचार्‍यांचे आंदोलन राजकीय दबावातूनच!

अहमदनगर/पारनेर | Ahmednagar

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे तालुक्यातील महसूल कर्मचार्‍यांवर मनमानी व दडपशाही करत आहेत. यामुळे त्यांची तहसीलदारांची तालुक्यातून इतरत्र बदली करा अन्यथा आम्हा कर्मचार्‍यांची बदली करा या मागणीसाठी पारनेरचे 41 महसूल कर्मचारी 25 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. कर्मचार्‍यांवर राजकीय दबाव टाकून त्यांच्या निवेदनावर सह्या घेतल्या आहेत. सह्या करणार्‍यांपैकी काही कर्मचारी यांनी मला याबाबत सांगितले, आमच्यावर दबाव टाकून निवेदनावर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध महसूल कर्मचार्‍यांचे असणारे आंदोलन हे राजकीय दबावातून असल्याचा दावा तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे.

तहसीलदार देवरे यांची आत्महत्या करावीशी वाटते ही ऑडिओ क्लिप राज्यभर गाजली होती. त्याअनुषंगाने तहसीलदार देवरे यांनी सोमवारी (काल) जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन म्हणणे सादर केले. यावेळी तहसीलदार देवरे या प्रथमच प्रसार मध्यमांसमोर बोलल्या. त्या म्हणाल्या, मी कुठलीही अफरातफर केली नसून या प्रकरणाची राज्यस्तरीय महिला अधिकार्‍यांकडून चौकशी व्हायला पाहिजे. मी चौकशी समितीला सहकार्य करण्यास तयार आहे. ऑडिओ क्लिप ही माझीच आहे. परंतु ती मी व्हायरल केलेली नाही. ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर स्वतः समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी माझ्याशी 10 ते 12 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माझा मोबाईल बंद असल्याने माझ्याशी संपर्क झाला नाही. मला जेव्हा समजले की स्वतः अण्णा माझ्याशी संपर्क करत आहेत तेव्हा मी रविवारी अण्णांना जाऊन भेटले त्यांनी मला धीर दिला. तुम्ही एक धाडसी महिला अधिकारी असून आत्महत्ये सारखा विचार मनात आणणे चुकीचे आहे. तुकाराम मुंढे यांच्या सारखे तुम्ही निर्भीड राहायला हवे, असा वडीलकीचा सल्ला अण्णांनी दिला आहे.

महसुल कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाबाबत तहसीलदारांना विचारले असता त्या म्हणाल्या, लोकप्रतिनिधी व राजकीय दबावापुढे आमचे वरिष्ठ अधिकारी काही बोलू शकत नाहीत तर हे कर्मचारी आहेत. तहसीलदारांची तर आम्ही बदली करणारच आहोत, तुम्हाला जर तालुक्यात काम करायचे असेल तर तहसीलदारांच्या विरोधातील आंदोलनात तुम्हाला सहभाग घ्यावाच लागेल असा दबाव टाकून कर्मचार्‍यांच्या सह्या घेतल्या आहेत. सह्या घेतलेल्या काही कर्मचार्‍यांनी मला येऊन सांगितले की आम्हाला दबाव टाकून आमच्या सह्या घेतल्या आहेत. माझ्यावर देखील खूप राजकीय दबाव आहे. मला अजून देखील त्रास देण्याचे प्रकार सुरू आहे. याप्रकरणी राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत.

Title Name

दबावाला बळी पडणार नाही -

चालक तहसीलदार देवरे यांच्या वाहनाचे चालक आबा रावसाहेब औटी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, मला तहसीलदारांनी मारहाण केली नसताना देखील तहसीदारांनी मारहाण केली आहे, असे माझ्याकडून दबाव टाकून लेखी लिहून घेण्यासाठी मला अनेकांचे अद्यापपर्यंत फोन येत आहेत. मी कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. तहसीलदार देवरे यांचे काम चांगलेच आहे, त्यांनी मला कधीच मारहाण केली नाही. वरिष्ठ म्हणून त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. मी नेहमी तहसीलदारांच्या सोबत राहणार असल्याचे वाहनचालक आबा औटी यांनी सांगितले.

Title Name

माझ्याविरुद्ध चुकीच्या बातम्या पेरल्या जातात - देवरे

जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी मला धीर देत वडीलकीचा सल्ला दिला. परंतु तालुक्यात काही प्रसार माध्यमांनी तहसीलदार देवरे यांना अण्णांनी हाकलवून दिले अशी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्याचा मला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे तहसीलदार देवरे यांनी बोलून दाखवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com