तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !

तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गेल्या दीड-दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमांना मर्यादा तसेच निर्बंध लागू होते. तसेच लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा करोना महामारीमुळे निर्बंध होते. परंतु आता लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रमास काही निर्बंध कमी करण्यात आले आहे.

हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर होणारे विवाह हे शुभ मानले जातात. परंपरेला धरून रितीरिवाजानुसार लग्न समारंभ रूढी-परंपरा मानत 19 नोव्हेंबरपासून म्हणजे तुळशी विवाहानंतर लग्न समारंभ धूम धडाक्यात सुरू होणार आहेत.

दीपावली उत्सवानंतर आता लग्नाचा धूम धडाका सुरू होणार असल्याने 19 नोव्हेंबर ते 9 जुलैपर्यंत मुख्यकालातीथ नियमित 63 व आपतकाल 20 असे 83 विवाहमुहूर्त असल्याचे येथील वेदसंपन्न शास्त्री मकरंद लावर गुरुजी यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये 4, डिसेंबर 11, जानेवारी 5, फेब्रुवारी 6, मार्च 4, एप्रिल 6, मे 11, जून 10, व जुलै 6, असे मुख्यकालातीथ मुहूर्त आहे तर आपतकाल मुहूर्त मध्ये नोव्हेंबर 5, फेब्रुवारी 7, मार्च 8 असे मुख्यकालातीथ व आपतकाल मिळून एकूण 83 मूहर्त लावर गुरुजी यांनी सांगितले.

विवाह समारंभावर अनेक कुटुंबाची रोजीरोटी अवलंबून असल्यामुळे पंचांगकर्त्यांनी योग्य निर्णय घेऊन हे मुहर्त दिले आहे.असे ही लावर म्हणाले.

करोनामुळे अनेक विवाह घरगुती व मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळा खर्चिक होणार असून अनेक इच्छुक वर वधू व घरच्यांनी लग्नसमारंभासाठी खर्च करण्याची तयारी ठेवली असल्याचे समजते.

तुलसी विवाहानंतर खर्‍या अर्थाने विवाह सोहळे सुरू होणार असल्याने या विवाह सोहळ्यामुळे कित्येक लोकांचे आर्थिक गणित त्यामुळे सुधारणार आहे. यामध्ये मंडपवाले, मंगल कार्यालय, बँड पथक, केटर्स, पुरोहित फुल भंडारवाले, हार विक्रेते, ब्युटी पार्लर, फोटोग्राफर, फ्लेक्सवाले, प्रिंटिंग प्रेस, कापड दुकानदार, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स, इत्यादी व्यावसायिकांचा रोजीरोटीचा प्रश्न या लग्न सोळ्यामुळे काही प्रमाणात सुटणार असून आर्थिक उलाढाल वाढणार आहे. तसेच लग्नसमारंभ पार पडताना वर्‍हाडी मंडळी, वर-वधू यांच्या घरातील लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे व प्रशासनाने वेळोवेळी करोना संदर्भातील केलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कारण यावर्षी बहुतेक विवाह समारंभ मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार आहेत.

यावेळी विक्रांत दंडवते म्हणाले की, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस बुकिंगचे पैसे शंभर टक्के परत दिले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून मंगल कार्यालय ओस पडली होती. यामुळे आमचे कार्यालयाचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघाला नाही. मात्र यावर्षी मुहूर्त भरपूर असल्याने व करोनाचा पादुर्भाव कमी होत आहे. यामुळे मंगल कार्यालय परत सजतील अशी आशा आहे.

गोविंद महाराज म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांपासून ओढवलेल्या करुणा संसर्गामुळे कॅटर्स चालक-मालक व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे परंतु यावर्षी करोनाचा प्रभाव कमी झाल्याने व शासनानेही सर्व निर्बंध हटवल्याने येणारे दिवसे कॅटर्स चालक -मालक व कामगारांना नक्कीच सुखाचे येतील अशी अपेक्षा आहे.

राजेंद्र वाबळे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो की, करोना महामारीमुळे आमचा अडलेला गाडा सुरळीत कधी होतो. यावर्षी लग्न तारखा भरपूर असल्यामुळे मंगल कार्यालय यांना चांगले दिवस येतील यात काही शंका नाही. जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कार्यालयात येताना सर्वांनी सोशल डिस्टंसिंग व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एन्ट्री करताना आम्ही सॅनिटायझरचा तसेच इतर करोना प्रतिबंधा संदर्भातील गोष्टी ठेवत आहोत.

संदिप वाव्हळ म्हणाले, लग्न सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्ष बंद होते. त्या मुळे फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग करणारांना आर्थिक अडचण वाढली होती. अनेकांनी दोन वर्षपूर्वी महागडे कॅमेरे घेतले होते. मोठा आर्थिक फटका बसला होता. आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दिलीपराव रोहोम म्हणाले, आपल्या देशातील समाजबांधव उत्सव प्रिय असल्याने दोन वर्षापासुन सरकारचे करोनाने नियंत्रण आले होते. आता नियंत्रण उठल्याने लोक उत्सहाने सहभाग घेत आहेत. वाजंत्री वाले, केटरिंग, व्यापारी बाजार पेठ, कलाकार यांना नवसंजिवनी देणारा हा हंगाम आहे. यामुळे लग्न सोहळ्यावर जे जे अवलंबून आहे त्या सर्वांना चांगले दिवस येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com