राहुरीची माहेरवाशिण तुळजाभवानीच्या पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान

राहुरीची माहेरवाशिण तुळजाभवानीच्या पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तसेच राहुरीची माहेरवाशीण असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या पालखीचे काल राहुरी येथून वाजतगाजत मोठ्या उत्साहात तुळजापूरकडे प्रस्थान झाले. तुळजापूरला नवरात्री उत्सवात मोठे मानाचे स्थान असलेल्या व राहुरीत विविध समाजाच्या सहभागातून तयार झालेल्या भवानी मातेच्या पालखीचे विधिवत पूजन व आरती बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, सौ. सुजाताताई तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे व सौ. सायली तनपुरे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, रावसाहेब चाचा तनपुरे यांच्याहस्ते करण्यात आले.

महाआरती करून पालखीची साडी चोळीने ओटी भरली. त्यानंतर आई तुळजा भवानीचे माहेरघर असलेल्या मंदिरातून पालखी निघाली. यावेळी तरुणांनी पालखी खांद्यावर घेऊन ‘आई राजा उदो उदो’ च्या घोषणा देत शिवाजी चौक परिसरात भंडार्‍याची उधळण करत पालखीला खेळवीले. तसेच विशेष मानकरी असलेले अण्णासाहेब शेटे, सुरेश धोत्रे, इंगळे आदींच्या घरासमोर पालखीचे पूजन करून ओटी भरण्यात आली.

यावेळी आसाराम शेजुळ, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, संतोष आघाव, बाळासाहेब उंडे, पांडू उदावंत, अरुण ठोकळे, सुरेश धोत्रे, विलास जंगम, संजय पन्हाळे, संदीप सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, किशोर इंगळे, अर्जुन बुर्‍हाडे, राजेंद्र इंगळे, नरेंद्र शिंदे, रमेश जंगम आदींसह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी छबीन्यापूर्वी पालखीचा दांडा राहुरीत आल्यानंतर शहरातील सुतार समाजाच्यावतीने पालखीचा साठा बनवण्यात आला. तर लोहार समाजाच्यावतीने पालखीसाठी लागणारे लोखंड देण्यात आले. अशाप्रकारे सर्व मानकरी घरांच्यावतीने पालखीसाठी लागणारे साहित्य देऊन पूर्ण पालखी सजविण्यात आली. ती पालखी आज पुष्पहारांनी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये ठेवून शहरातील शिवाजी चौक, विद्यामंदिर शाळेसमोर इंगळे परिवार, शिवाजी चौक, शनि चौक, आझाद चौक, लक्ष्मी माता मंदिर लक्ष्मीनगर, अंबिका देवी मंदिर, डावखर खळवाडी, भुजाङी कॉर्नर, गोकुळ कॉलनी आनंदऋषी उद्यान रोड, नवीपेठ, शुक्लेश्वर चौक, कानिफनाथ चौक, क्रांती चौक, मानकेश्वरी आई देवी मंदिर, राजवाडा, दत्त मंदिर, सोनार गल्ली, वाल्मिक श्रृषी मंदिर, गणपती घाटावरून सायंकाळी उशीरा देसवंडी मार्गे तुळजापूरकडे पालखीचे प्रस्थान झाले. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी शहरातील हजारो भक्त उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com