23 लाखांच्या ऐवजासह संगमनेर, कोपरगावचे चौघे अटकेत

ट्रक लुटणारी टोळी वाळूजला जेरबंद
23 लाखांच्या ऐवजासह संगमनेर, कोपरगावचे चौघे अटकेत

औरंगाबाद | Aurangabad

लोखंडी सळई घेऊन पुण्याला जाणार्‍या चालत्या ट्रकला स्कॉर्पिओने अडवून लुटणार्‍या टोळीचा वाळूज पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या टोळीकडून 23 लाख रूपयांच्या मुद्देमालासह चौघा दरोडेखोरांना पोलीस पथकाला अटक करण्यात यश मिळाले. तर अद्याप गुन्ह्यातील काही आरोपी पसार झाले आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने परिसरातून पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

ट्रकचालकाच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची 11 ऑगस्ट रोजी नोंद केली. त्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके तयार केली. ही पथके नाशिक, नगर तसेच औरंगाबाद ग्रामीण भागात पाठविण्यात आली. या भागातील काही गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलीस पथकाने दरोडेखोरांचा मागोवा काढला.

या कामी काही तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन दरोड्यातील आरोपींचा शोध घेतला. त्यात आकिब हारून मनियार (रा.सय्यद सादात चौक, संगमनेर, जि.नगर) , मोहम्मद सालेम जमीर कुरेशी (मोगल मोहल्ला, संगमनेर जि.नगर), नितीन अशोक जगताप (रा.साईलक्ष्मी नगर, कोपरगाव), नासेर गुलाब शेख (रा.साकुर , संगमनेर, जि.नगर ) या दरोडेखोरांचे निष्पन्न झाले. त्यांनी इतर सहकार्‍यांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबूली दिली. गुन्ह्यातील ट्रक हा नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतला. तर कोपरगाव येथील नितीन जगताप, तर संगमनेरचा नासेर शेख या दोघा आरोपींनी गुन्ह्यातील 19 टन 20 किलो वजनाच्या सळ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या. दरोडेखोरांनी मुद्देमाल लंपास करण्यासाठी वापरलेली दोन वाहने असा मिळून सुमारे 23 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर इतर फरार दरोडेखोर लवकरच अटक करण्यात यश येईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक संदिप गुरमे यांनी व्यक्त केला. सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, गोरख चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख, पोलिस अंमलदार प्रदीप बोरूडे, सचिन राजपुत्र, सलिम शेख, पंकज गायकवाड, पांडुरंग शेळके, शिवराज खाकरे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

ट्रकमालक व चालक असलेले उमेश सोनवणे (वय 39, रा. वाफेगाव ता.माळशिरस जि.सोलापुर) हे 10 ऑगस्टला त्यांच्या ट्रकमधून जालन्यातील कंपनीतून लोखंडी सळई घेऊन पुण्याला निघाले होते. त्यानंतर ते ता.11 ऑगस्ट रोजी भल्या पहाटे औरंगाबाद-नगर महामार्गावर पोहोचले. त्यांनी वाळूज गाव सोडल्यानंतर पुढे ते जात असताना एका कंपनीलगतच्या पुलाजवळ त्यांना हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओने त्यांना अडविले. या स्कॉर्पिओतून उतरलेल्या चौघा अनोळखींनी सोनवणे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या चेहर्‍यावर कपडा बांधून त्यांना स्कॉर्पिओतुन नेत तासाभराने धुळे बायपास मार्गावर सोडून दिले होते. दरम्यानच्या वेळेत दरोडेखोरांनी 19 टन 20 किलो सळईसह ट्रक लंपास केला होता. सोनवणे हे अन्य वाहनातुन प्रवास करीत ट्रक सोडलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यामुळे, त्यांनी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी 11 लाख रुपयांच्या लोखंडी सळई व पाच लाख रुपयांचा ट्रक असा मिळून 16 लाख रूपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com