तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून 300 लिटर डिझेल चोरीची घटना

ताजी असतानाच गावानजीकच्या तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या तीन मालवाहू ट्रकमधून चोरट्यांनी पुन्हा 300 लिटर डिझेलची चोरी केली. बुधवारी (दि. 24) सकाळी सहा वाजेच्या सुमारास डिझेल चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने डिझेल चोरांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे आता उघड होत आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक तिरुपती बालाजी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी चालक सोमनाथ सज्जन गिड्डे (ट्रक क्र. एमएच 24 एबी 7576), चालक चांगदेव हरिबा सुर्वे (ट्रक क्र. एमएच 13 एएक्स 2305 दोघेही रा. मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर) व चालक दिलदार जब्बार (ट्रक क्र. एपी 04 वाय 2869 रा. तुंकूर, कर्नाटक) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक तळेगाव दिघे येथील तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी उभ्या केलेल्या होत्या व चालक व क्लिनर ट्रकमध्येच झोपलेले होते.

दरम्यान मध्यरात्रीनंतर एक ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी तिनही ट्रकच्या इंधन टाक्यांचे झाकणे तोडून पहिल्या ट्रकमधुन 170 लिटर दुसर्या ट्रकमधुन 90 लिटर, तर तिसर्या ट्रकमधून 50 लिटर डिझेलची चोरी केली. डिझेल चोरीसाठी चोरटे चारचाकी वाहन, टिल्लू मोटर व पाईपचा वापर करतात. सोमवारी (दि. 22) रात्री गावानजीकच्या समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी 300 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या तीन ट्रकमधून 300 लिटर डिझेलची चोरी झाली.

त्यामुळे तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरांचे मोठे रॅकेट असल्याचे उघड होत आहे. मालवाहू ट्रक चालक दूरचे असल्याने सहसा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जात नाही. त्यामुळे डिझेल चोरांचे अधिकच फावत आहे. तळेगाव दिघे येथील पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या ट्रकांमधून वारंवार डिझेल चोरीच्या घटना घडत असून पोलिसांनी डिझेल चोरांच्या रॅकेटचा फर्दापाश करावा अशी मागणी ग्रामस्थ व मालवाहू ट्रक चालकांकडून करण्यात येत आहे.