नगरमधील 76 हजार घरांवर फडकणार तिरंगा

मनपाकडून नियोजन; 20 ठिकाणी विक्री केंद्र
तिरंगा
तिरंगा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात राबविण्यात येणार्‍या हर घर तिरंगा अभियानांतर्गत नगर शहरात 75 हजार 960 घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. नागरिकांना सशुल्क तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी शहरात 20 ठिकाणी विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांची या अभियानासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने 75 हजार 960 तिरंगा ध्वजाची मागणी नोंदवली आहे. यातील 51 हजार तिरंगा ध्वज शासनाकडून घेतले जाणार आहेत. तर सुमारे 25 हजार तिरंगा ध्वजाची महापालिकेमार्फत खरेदी होणार आहे. अभियानाचे नियंत्रण, प्रचार व प्रसिद्धी, वितरण, पुरवठादार निश्चितीकरण अशा चार समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त राऊत यांच्या नियंत्रणाखाली चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या प्रभाग अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

महापालिकेच्यावतीने मनपा मुख्यालय, चारही प्रभाग समिती कार्यालये यासह या कार्यालयाअंतर्गत ठिकाणे निश्चित करून शहरात सुमारे 20 ठिकाणी ध्वज विक्री केंद्र उभारणीचे नियोजन महापालिकेमार्फत सुरू आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

प्रभावी अंमलबजावणी करावी- वाकळे

केंद्र सरकारच्यावतीने संपूर्ण देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा ही संकल्पना राबविण्याचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेमार्फत या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com