
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे साईबाबा महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवार 25 जुलै 2022 रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या प्रचारासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याहस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली.
अहमदनगरचे केंद्रीय संचार ब्यूरो आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, माहिती अधिकारी सुरेश पाटील, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी कुमार, साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे, साईबाबा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. व्ही. वरघुडे आदी उपस्थित होते.
या तिरंगा रॅलीस कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्याथी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साधारणत: हजार ते पंधराशे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात भारताचा कापडी राष्ट्रध्वज होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीत राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भारत माता, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या वेशभुषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा 75 या अंकाचा देखावा साकार केला.
तिरंगा रॅलीत शुभेच्छा देतांना श्रीमती बानायत म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशाप्रती जाज्वल्य भावना जागृत राहणार आहेत.
श्री.जायभाये म्हणाले, श्री.साईबाबा संस्थानच्या देवालयाच्या प्रांगणात 26 ते 28 जुलै रोजी, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.