
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शिक्षणातून समाजाची प्रगती होत असते. आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना चांगले शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याकरता शिष्यवृत्ती मिळणे अधिक सुलभ व्हावे अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे सरकारकडे मागणी करताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. या समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. याचबरोबर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. तथापि ही शिष्यवृत्तीसाठी पुरेसा प्रचार नसल्याने अनेक युवकांना याबद्दल माहिती नसते व यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळतो.
यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून याकरता या शिष्यवृत्ती योजनेमध्ये अधिक सुलभता आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर याबाबतची माहिती या आदिवासी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावे. आदिवासी विद्यार्थी हा अत्यंत गरीब असल्याने त्याला शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही कमी पडत आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती वाढ करावी अशी मागणी ही आमदार डॉ. तांबे यांनी केली असून याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल असे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांनी लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत आश्वासित केले आहे.
आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मागणीमुळे नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव सह राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा मोठा फायदा होणार असून शासनाच्या शिष्यवृत्तीसह विविध योजना तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवाव्या यासाठी शासनाकडून विशेष पाठपुरावा होणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. या मागणीबद्दल विविध आदिवासी विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे अभिनंदन केले आहे.