
अकोले |प्रतिनिधी| Akole
शालेय शिक्षण बुडू नये यादृष्टीने सुरू असलेल्या ई- लर्निंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत अँड्रॉईड मोबाईल किंवा टॅब उपलब्ध करून द्यावे व ज्या भागात मोबाईलला रेंज नाही त्या भागात टॉवर उभे करावे, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी आमदार पिचड यांनी पत्रात लिहिले आहे की, सध्या देशात व राज्यात करोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. करोना या विषाणूमुळे मार्च 2020 ते अद्यापपावेतो सर्व शाळा बंद आहेत. या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. त्यामुळे कोणाच्याही हाताला कामधंदा नाही, कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही.
कुटुंब चालविणे फार मोठे मुश्कील झालेले आहे. अकोले मतदारसंघामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे शिक्षण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व त्यांच्या प्रगतीवर परिणाम होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून ई-लर्निंगचे शिक्षण देणेबाबत सूचना व आदेश प्राप्त झालेले आहेत.
तथापि अकोले, जि. अहमदनगर या पूर्णपणे तालुक्यामध्ये बहुतांशी पालक हे गरीब कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी अॅन्ड्रॉईड मोबाईल व टॅब खरेदी करणे व ते वापरणे त्यांना परवडणारे नाहीत. तशातच तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी व अतिदुर्गम आहे. याठिकाणी मोबाईल टॉवर नाहीत. त्यामुळे मोबाईल नेटवर्कींग नाही.
यासाठी मोबाईल टॉवर उभारणे व गाडीवरील मोबाईल एरियल टॉवर देणे गरजेचे आहे व या तालुक्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरून अॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा टॅब मोबाईल उपलब्ध करून दिल्यास या तालुक्यातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण मिळू शकेल. तसेच ग्रामीण भागातील शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक प्रत्यक्ष त्या गावात मुख्यालयी राहत नाहीत.
ते राहिल्यास विद्यार्थ्यांचे छोटे - छोटे गट(समूह)करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुवत्ततेचे प्रमाण वाढेल व त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
म्हणून या तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुले या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून, आपल्या स्तरावरून अॅन्ड्राईड मोबाईल, टॅब मोबाईल, एरियल टॉवर, तसेच मोबाईल टॉवर उपलब्ध होणेबाबत संबंधितांना सूचना व आदेश व्हावेत, असे पत्र माजी आमदार पिचड यांनी दिले.