
राजुर |वार्ताहर| Rajur
अकोले तालुक्यातील शिरपुंजे आश्रम शाळेतील अधीक्षक यांनी केलेल्या कृत्याची दखल घेऊन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी अधीक्षक अश्विन कुमार अर्जुनराव पाईक यास निलंबित केले आहे. तसेच मुख्यालय सोडून जाता येणार नाही, याचबरोबर इतर दुसरे कोणतेही काम करता येणार नसल्याबाबत आदेश काढले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी शिरपुंजे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी केरकचरा गोळा केला होता. मात्र थंडीचे दिवस असल्याने या मुलांनी सदर कचरा पेटून शेकोटी घेतली. हा प्रकार अधीक्षक अश्विन कुमार पाईक याने पाहिल्यानंतर त्याने विद्यार्थ्यांना मारहाण करून जळत असलेल्या पेटत्या लाकडाच्या काड्याद्वारे विद्यार्थ्यांना मारहाण केली.
यात विद्यार्थ्यांना इजा झाली. यामुळे त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधीक्षकाच्या या गैरकृत्यामुळे काही सामाजिक, राजकीय संघटना, माजी आमदार वैभवराव पिचड व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी याविषयी आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शिरपुंजे आश्रम शाळेतील अधीक्षक अश्विन कुमार पाईक याच्यावर पोलीस कारवाईनंतर अप्पर आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शासकीय आश्रम शाळांमधील अनागोंदी कारभार अनेक वेळा चव्हाट्यावर आलेला आहे. यावर सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस आश्रम शाळामध्ये दुरावस्था पहावयास मिळत आहे. यामुळे राजुर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.