तिरंगा फडकवण्यासाठी घर द्या

आदिवासी, कष्टकरी, बेघरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
तिरंगा फडकवण्यासाठी घर द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हर घर तिरंगा, तिरंगे के लिए घर कहाँ, तिरंगा फडकवण्यासाठी घर द्या, इन्कलाब जिंदाबाद, लाल बावटे की जय अशा घोषणा देत नगरमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, कष्टकरी आणि बेघरांनी मोर्चा काढला. शहीद कॉम्रेड भगतसिंह स्मारक येथील पुतळ्यास रुक्मिणी गोलवड, कांताबाई माळी, कैलाबाई गोलवड, अलका गोलवड, अंजाबाई बर्डे, जयश्री माळी या आदिवासी महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात झाली.

हडको बस स्टॉप, मकासरे हेल्थ क्लब, तोफखाना पोलीस स्टेशन, प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहोर रोड चौक, गुलमोहोर पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा गेला. मोर्चात कामगार संघटना महासंघ, सिटू, आयटक, ऑल इंडिया युथ फेडरेशन, नगर हॉकर्स संघटना, भिल्ल संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी सभेचे सदस्य सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. डॉ. महेबूब सय्यद, किसान सभेचे अ‍ॅड. बन्सी सातपुते, विकास प्रकाश गेरंगे, हॉकर्स संघटनाध्यक्ष संजय झिंजे, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, भिल्ल संघटनेचे चंद्रकांत माळी, आयवायएफचे फिरोज शेख, दीपक शिरसाठ, अरुण थिटे, तुषार सोनवणे आदींनी केले.

यावेळी कॉ. लांडे म्हणाले, देशाच्या प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतामध्ये घर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. रेडिओ, टिव्ही, इंटरनेट आदींद्वारे याचा प्रचार सुरू आहे. या मोहिमेवर अब्जावधी रुपये खर्चले जाणार असल्याचे दिसून येत आहे. पण ज्यांना घरच नाही त्यांनी तिरंगा कुठे फडकवायचा? त्यासाठी आम्ही सरकारकडे घरे मागत आहोत, असे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com