अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने शेती ही पावसावर अवलंबून असते.

खरीप म्हणजेच पावसाळी हंगाम हा इथला मुख्य हंगाम मानला जातो. जंगली प्राणी, लहरी पर्जन्यमान, आपुर्या जलसिंचनाच्या सोयी अशा विविध अडचणींवर मात करत व निसर्गाशी जुळवून घेत इथे शेती करावी लागते. त्यामध्ये केली जाणारी शेती शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे.

त्यामुळे कमी जागेत अधिक उत्पन्न घेता येणे शक्य होणार आहे. यासाठी इथल्या शेतकर्यांना नाबार्ड पुरस्कृत व बायफ पुणे संचलित हवामान बदल प्रकल्पाअंतर्गत तांत्रिक शेती करण्याचे मार्गदर्शन व सहकार्य केले जात आहे. पारंपरिक पिकांसोबतच तंत्रशुद्ध पद्धतीने भाजीपाला लागवड करण्याचे तंत्रज्ञान आदिवासी शेतकर्यांना अवगत केले जात आहे. त्यासाठी पॉलिमल्चिंग व ठिबक सिंचन यांचा वापर करून केली जाणारी शेती येथे केली जात आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून त्यासाठी प्रकल्पातील सात गावांमध्ये आंबेवंगण, लाडगाव, मान्हेरे, पिंपरकणे, कोंदणी, डोंगरवाडी या गावातील निवडक शेतकर्यांना सोबत घेऊन विविध पिकांची प्रात्यक्षिके करण्यात आलेली आहेत. चालू रब्बी हंगामामध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो, वालवड यासारखी भाजीपाला पिके घेण्यात आली आहेत. शेतकर्यांना पॉली मल्चिंगचे तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

पॉलिथिन मल्चिंग चा वापर करून ठिबकचा वापर करून येथे शेती पिकविली जात आहे. कांदा लागवड पॉलिमल्चिंग पेपरचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून आंबेवंगण गावातील शांताबाई धांडे या प्रगतिशील महिला शेतकर्याकडे करण्यात आलेली आहे. या पद्धतीने कांदा लागवड तालुक्यात पहिल्यांदाच होत असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास आदिवासी शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेणे शक्य होणार आहे व जंगली प्राण्यांपासून संरक्षण करता येणार आहे. म्हणजेच कांद्या सारखे पीक माकडांना उकरून खाता येणार नाही. जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहिल्याने कमी पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे. पॉलिमल्चिंग पद्धतीमुळे तण निवारण करण्यासाठी होणारा खर्च 100% वाचला जातो.

प्रकल्पाच्या माध्यमाने एकूण 40 लाभार्थ्यांना ठिबक सिंचन बसवून देण्यात आलेले आहेत. तर एकूण 19 लाभार्थ्यांकडे पॉलिमल्चिंग पद्धतीने भाजीपाला लागवडीचे प्रात्यक्षिके घेण्यात आलेली आहेत. ठिबक सिंचन बसवून देण्यासाठी 50 टक्के सहभाग लाभार्थ्यांनी दिलेला आहे तर पॉलिमल्चिंग पेपरसाठी 20 टक्के सहभाग लाभार्थ्यांनी प्रकल्पाकडे भरलेला आहे.

प्रकल्पातील मान्हेरे, लाडगाव, आंबेवंगण, कोंदणी, पिंपरकणे, डोंगरवाडी, टिटवी या सात गावांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बायफचे प्रकल्प समन्वयक व जलतज्ञ रामनाथ नवले, कृषी तज्ञ शुभम नवले व रोहिदास भरीतकर, लीला कुर्हे, राम कोतवाल, योगेश नवले, मच्छिंद्र मुंढे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. गावांमध्ये तयार करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास समित्यांचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांचेही मोलाचे योगदान प्रकल्प उभा करण्यासाठी व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी होत आहे.