अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये डोंगर-उताराच्या आणि छोट्या आकाराच्या जमिनी उपलब्ध असल्याने

त्यामध्ये केली जाणारी शेती शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे कमी जागेत अधिक उत्पन्न घेता येणे शक्य होणार आहे.

ग्लोबल वार्मिंगच्या तडाख्यात शेती सापडल्याने उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा व संसाधनांचा योग्य वापर करून शेतीतून मिळणारे उत्पादन वाढवणे यावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यानुसार नाबार्ड पुरस्कृत व बायफ पुणे संचलित हवामान बदल प्रकल्पाअंतर्गत चालू रब्बी हंगामात गहू या पिकाचे बियाणे पेरणी ऐवजी टोभणी करून लागवडी घेण्यात आल्या आहेत.

जागतिक तापमान वाढीच्या समस्येमुळे पर्यावरणात होणारे विविध बदल व त्यातूनच पर्जन्यमानात झालेला बदल त्यानुसार शेतीत तंत्रशुद्ध बदल घडवून उत्पादन वाढवण्यावर प्रकल्पांतर्गत भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चालू हंगामात गहू या रब्बी हंगामातील मुख्य पिकांमध्ये तांत्रिक बदल करून उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न प्रकल्पांतर्गत येणार्या सात गावांमध्ये करण्यात आलेले आहेत.

गहू या पिकाचे एकूण 147 प्रात्यक्षिके देण्यात आलेली असून त्यापैकी 20 शेतकर्यांनी गव्हाचे बियाणे पेरणी न करता टोभणी करून लागवडी घेतल्या आहेत. प्रकल्पांतर्गत येणार्या टिटवी या गावामधील मारुती मुंढे या तरुण शेतकर्याने प्रकल्पाकडून मार्गदर्शन घेत गव्हाची याच पद्धतीने लागवड केली आहे. सुमारे अर्धा एकर क्षेत्रावर या पद्धतीने गव्हाची लागवड त्यांनी केली आहे.

संशोधनानुसार या पद्धतीमुळे गव्हाचे बियाणे 50 टक्के बचत होते. पाण्याची उपलब्धता कमी अधिक झाल्यास पीक ताण सहन करू शकते. कारण सरी-वरंब्यावर असलेला मातीचा भाग जास्त काळ ओलावा धरून ठेवतो व पाणी कमी द्यावे लागते. यापद्धतीने लागवड केलेल्या शेतात तणांचे प्रमाण कमी होते तसेच कापणी आणि काढणी सोपी होते.

एकरी रोपांची संख्या मर्यादित राहिल्याने वाढ सशक्त आणि निरोगी होते. सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिल्याने पीक निरोगी आणि उत्तम वाढते. उत्पादनामध्ये सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ होत असते. आदिवासी भागातील शेतकर्यांकडे कसण्यायोग्य जमिनी कमी असल्याने उपलब्ध असलेल्या जमिनींचा योग्य वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे यावर प्रकल्पाने भर दिलेला आहे.

प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बायफचे प्रकल्प समन्वयक व जलतज्ञ रामनाथ नवले कृषी तज्ञ शुभम नवले व रोहिदास भरीतकर, राम कोतवाल, योगेश नवले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

गावांमध्ये तयार करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास समित्यांचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांचेही मोलाचे योगदान प्रकल्प उभा करण्यासाठी व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी होत आहे.