
अकोले |प्रतिनिधी| Akole
आदिवासी प्रश्नांसाठी आज शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी रोजी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार निवासस्थानी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव व पारनेर तालुक्यातून श्रमिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत.
बोगस आदिवासींची घुसखोरी, आश्रमशाळा, वसतिगृहे व शिक्षणाचे प्रश्न, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, बाळहिरडा व इतर वन उपज यांच्या हमीभावाचा प्रश्न, आदिवासी श्रमिकांची बेरोजगारी आणि कुपोषणाचा प्रश्न, आदिवासी वाड्या-पाड्यांवर आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रश्न, अशा असंख्य समस्यांनी आदिवासी समुदाय त्रस्त झाला आहे.
या सर्व गोष्टींकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत आहे. तसेच आदिवासी विकास मंत्री आदिवासींच्या विकासाची भूमिका घेण्याऐवजी आदिवासीविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्याचा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांना जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या झेंड्याखाली विविध संघटना एकत्र येत मोर्चा काढत आहेत. या मोर्चात पूर्ण ताकदीने सामील व्हावे, असे आवाहन नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, एकनाथ गिर्हे, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे आदिंनी केले आहे.