आदिवासी भागात उन्हाळी नाचणी पीक पद्धती यशस्वी - गोसावी

आदिवासी भागात उन्हाळी नाचणी पीक पद्धती यशस्वी - गोसावी

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील आदिवासी भागात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी उन्हाळी भुईमूग, बाजरी व थोडेफार टोमॅटोचे पीक घेतले जात होते.

परंतु जंगली रानडुकरे व माकडांचा त्रास, वाढता उत्पादन खर्च, दूरची बाजारपेठ यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. यावर्षी कृषी विभाग व आत्माने उन्हाळी नाचणी या पर्यायी पीक पद्धतीची चाचपणी पथदर्शक प्रकल्पद्वारे केली. ही पीक पद्धती चांगलीच यशस्वी ठरली आहे.त्यामुळे आदिवासी भागात अतिशय भरलेली नाचणी लगडलेली दिसत असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले.

तालुक्यातील आदिवासी भागातील विविध गावांत उन्हाळी नाचणी शिवारभेटी दरम्यान शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. खडकी बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी गोसावी बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी गिरीश बिबवे, कृषी पर्यवेक्षक बी. एन. वाकचौरे, कृषी सहाय्यक शरद लोहकरे, यशवंत खोकले व आत्माचे बाळनाथ सोनवणे उपस्थित होते.

यावेळी प्रवीण गोसावी म्हणाले, खडकी बुद्रुक गावात आदिवासी तरुण शेतकर्‍यांनी एकत्र येत क्रांतिवीर सेंद्रिय भात उत्पादक गट स्थापन केला होता. त्यांचे संघटन व उत्साह बघून यावर्षी उन्हाळी नाचणीचा नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचे ठरले. सुरुवातीला साशंकता असल्याने केवळ 25 शेतकरी 9.5 एकर क्षेत्रावर लागवड झाली. यासाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर येथून फुले नाचणी बियाणे उपलब्ध झाले.

प्रथमच रोपवाटिकेत रोपे तयार केली. रोपे खूप चांगली आली. विशेष म्हणजे गटाने, समूहाने लागवड केली. लागवडी नंतर युरिया ब्रिकेटद्वारे खत व्यवस्थापन करण्यात आले. नंतर निमतेल व कीटकनाशके यांची फवारणी करून कीड नियंत्रण करण्यात आले. चांगली वाढ व्हावी म्हणून 19:19:19 व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी देखील करण्यात आली.

शेवटी दाणे भरण्याच्या अवस्थेत 0:52:34 फवारणी झाली. या सर्व बाबी गटातील शेतकर्‍यांनी मेहनतीने केल्या. आज त्याचा परिणाम म्हणजे सर्व प्लॉट दाणे भरले आहेत. आदिवासी युवकांच्या चेहर्‍यावर उन्हाळी नाचणी प्रयोग यशस्वी होत असल्याचे समाधान आहे. उन्हाळी नागलीचे उत्पन्न नक्कीच पावसाळी नागलीपेक्षा चांगले येणार आहे.

गटाचे अध्यक्ष अजित भांगरे म्हणाले, आता आम्ही दर वर्षी नाचणी करणार आहोत. सुरुवातीला धाकधूक होती कारण थंडीमुळे रोपांची वाढ हळू झाली जसा जसा उन्हाळा वाढला तसेच पीक बहरू लागले अन् आमच्या कष्टाचे सार्थक झाले. आजूबाजूचे शेतकरी नाव ठेवत होते. मात्र तेच शेतकरी आता नाचणीचे भरघोस गोंडे आलेले प्लॉट बघायला येत आहेत. आम्हालाही आता बियाणे द्या आम्हीही नाचणी करू असे ते म्हणत आहेत.

गटाचे शिलेदार सोमनाथ भांगरे म्हणाले, कृषी विभाग व आत्मा यांची प्रयोगासाठी बियाणे, खते व औषधे तसेच सातत्याने मार्गदर्शन व गटातील सर्व सदस्यांनी सूचनांचे केलेले अनुकरण म्हणून हा प्रयोग तालुक्यासाठी प्रेरक ठरला आहे. आम्ही आता गटाद्वारे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत विक्री केंद्र देखील सुरू केले आहे.

आता पुढील वर्षी मुळा काठावर मोठ्या प्रमाणावर नाचणीची लागवड होईल. सध्या खडकीचा उघडा माळरान मात्र नाचणीने फुलला आहे. घराघरांतून, आहारतून हद्दपार झालेली नाचणी लवकरच आदिवासी बांधवांच्या ताटात येईल व त्यांचे आरोग्य देखील सुधारेल हे देखील या प्रयोगाचे यशच आहे. या प्रयोगाला तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन आदिवासी युवकांचे कौतुक केले.

तसेच आत्मा उपप्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, नाचणी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश बन, बियाणे पुरवठा करणारे डॉ. सुनील कराड या सर्वांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. स्थानिक शेतकरी नामदेव भांगरे, संदीप भांगरे, लक्ष्मण भांगरे, काळू भांगरे व इतर गटातील सर्व शेतकरी यांनी यासाठी मेहनत घेतली. या गटा मार्फत चांगले बियाणे व कसदार नाचणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com