शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

विनापरवाना शासकीय गहू व तांदूळ वाहतूक करत असलेला टेम्पो संशयास्पद हालचालीवरून व पोलिसांना सतर्क नागरिकांकडून मिळालेल्या माहितीवरून

काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना अमरापूर ता. शेवगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ पकडण्यात आला. प्रभारी पुरवठा निरीक्षक संदीप मधुकर चिंतामण (तहसिल कार्यालय शेवगाव) यांनी पंचनामा केला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपानराव गोरे करीत आहेत.

पुरवठा निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात प्रल्हाद दिनकर पवार (वय-38 वर्षे, राहणार - नवगण राजुरी ता.जि.बीड ) व प्रदीप काळे (वय-35 वर्षे राहणार - वडुले बुद्रुक ता. शेवगाव ) यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1901 कलम 3 -7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणार्या केसभट वस्तीवरील पटांगणातून आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.एच16ए.ई 3345 हा 60 गोण्या तांदूळ व 100 गोण्या गहू असे 80 क्विंटल शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी काल मंगळवार ता.8 रोजी दुपारी घेऊन निघाला होता.

हा टेम्पो अमरापूर परिसरातील पेट्रोल पंपावर येऊन थांबला. यावेळी काही नागरिकांना संशय आल्याने टेम्पोमध्ये पाहिले असता गहू व तांदूळ असल्याचे दिसले. चालकाकडे त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर तेथे नायब तहसीलदार व्ही.के.जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक चिंतामण घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी चौकशी केली असता शासकीय गहू व तांदूळ विनापरवाना वाहतूक करत असल्याचे लक्षात आले. चिंतामण यांनी प्रत्येकी 50 किलो वजनाच्या 40 हजार रुपये किमतीच्या 60 गोण्या गहू व 60 हजार रुपये किमतीच्या 100 गोण्या तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा पंचनामा केला. तसेच हा टेम्पो पोलीस ठाण्यात जमा करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.