'या' तारखेपर्यंत होणार झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

ग्रामविकास विभागाचे आदेश : 15 टक्क्यांमध्ये होणार प्रशासकीय अन् विनंती बदल्या
'या' तारखेपर्यंत होणार झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - राज्यातील जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने पात्र असणार्‍या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याची कार्यवाही 31 जुलैच्या आत करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानूसार नगर जिल्हा परिषदेतही कार्यावाही सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशनूसार मंजूर पदााच्या 15 टक्के बदल्या होणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने दीड महिन्यांपूर्वीच 31 मार्च 2021 अर्हता दिनांक निश्‍चित करून बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करून त्यावर हरकती घेवून बदली पात्र कर्मचार्‍यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करून ठेवलेली आहे. तर आता ग्रामविकास विभागाने कर्मचार्‍यांच्या बदल्यांना परवागी दिल्याने जिल्हा परिषद बदल्यासाठी समुपदेशनाची प्रक्रिया राबवून कर्मचार्‍यांची सर्वसाधारण बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यापासून विभागनिहाय बदल्याचे वेळापत्रक तयार करून बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 14 जुलैला अध्यादेश काढला होता. यात राज्यातील अन्य विभागात बदल्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, झेडपी, पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या बदल्यासाठी ग्रामविकास विभागाची परवानगी आवश्यक असून ती परवानगी मिळाली आहे. या बदल्यामध्ये करोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम 6 अन्वये सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने करण्यात येणार आहेत. ज्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झालाय अशाच बदल्या कराव्यात. या बदल्यांची कार्यवाही 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदल्या करण्यास 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या काळात परवानगी राहणार आहे.

प्राथमिक शिक्षकांना वगळले

यापूर्वी ग्रामविकास विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे आदेश निघत होते. मात्र, 2017 पासून शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्या होत असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसीत केली आहे. त्याव्दारे शिक्षकांच्या बदल्या होणार असून या शिक्षकांच्या बदलीसाठी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र आदेश निघणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com