बदली पात्र 33 संवर्गातील कर्मचार्‍यांची अंतरीम यादी प्रसिध्द
सार्वमत

बदली पात्र 33 संवर्गातील कर्मचार्‍यांची अंतरीम यादी प्रसिध्द

जिल्हा परिषद : 18 तारखेपर्यंत हरकती अन् आक्षेप, 20 ते 25 जुलैदरम्यान प्रक्रिया होण्याची शक्यता

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील 33 संवर्गाच्या कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठतेच्या याद्या जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्या आहेत. या संवर्गनिहाय याद्यावर कर्मचार्‍यांना आक्षेप आणि हरकती घेण्यात येणार असून त्यानंतर संबंधित विभाग प्रमुख त्या हरकती-आक्षपे निकाली काढल्यानंतर अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. साधारणपणे 20 ते 25 जुलैच्या दरम्यान कर्मचार्‍यांची बदलीची प्रक्रिया पारपडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या मे महिन्यांत प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात येत असतात. यात 10 टक्के प्रशासकीय आणि 10 टक्के विनंती बदल्याचा समावेश असतो. यंदा करोना संसर्गामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व काही बंद होते. यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया होणार की नाही, याबाबत साशंकता होती.

तसेच लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय बंद असल्याने त्याचा ताण सरकारी तिजोरीवर पडल्याने आणि सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बदल्याची होणार नसल्याची चर्चा होती. मात्र, तीन दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाने झेडपी-पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या 15 टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार प्रत्येक विभागाने काल शनिवार जिल्हा परिषदेच्या 14 विभागातील 33 संवर्गातील कर्मचार्‍यांची सेवाज्येष्ठतेनूसार यादी प्रसिध्द केली आहे. यादीवर पुढील आठवड्यात हरकती आणि आक्षेप घेवून यादीत सुधारणा करण्यात येणार आहे. 18 जुलैला अंतिम यादी तयार होवून त्यानंतर 20 ते 25 जुलैच्या दरम्यान प्रत्यक्षात कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यंदा होणार्‍या 15 टक्के बदल्यामध्ये साडेसाक् टक्के प्रशासकीयआणि साडे सात टक्क्यांपर्यंत विनंती बदल्या होणार आहेत. यासाठी विभाग प्रमुखांनी 15 मे 2014 शासन निर्णयाचा आधार घेण्याच्या सुचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या होत्या. गतवर्षी 20 टक्क्यानूसार 250 ते 300 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या होत्या. यंदा करोना संसर्गामुळे होणार्‍या 15 टक्के बदल्यामध्ये गतवर्षीच्या तुलने होणार्‍या बदल्याची संख्या कमी राहणार आहे.

जिल्हा परिषदेत 20 जुलैनंतर कर्मचार्‍यांची बदलीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्मचारी बदल्याच्या प्रक्रियेला उपस्थित राहणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत गर्दी होणार असून या काळात करोना रोखण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासना समोर राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात करोनाचा कहर असून या कहराचा फटका जिल्हा परिषदेला बसण्याची शक्यता नाकाराता येत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com