बदली पात्र शिक्षकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द
सार्वमत

बदली पात्र शिक्षकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द

29 पर्यंत हरकती घेण्यास मुदत : 30 ला गटशिक्षणधिकारी अंतिम यादी करणार सादर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गुरूवारी सायंकाळी उशीरा जिल्ह्यात बदली पात्र आणि बदलीचा अधिकार प्राप्त शिक्षकांची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी गुरूवारी प्रसिध्द केली. प्रसिध्द झालेल्या यादीवर शिक्षकांना 29 जुलैपर्यंत हरकती घेता येणार असून त्यानंतर 30 तारखेला संबंधित गटशिक्षणाधिकारी दाखल हरकती आणि आक्षेप दुरूस्त करून अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणार आहेत.

ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल दाखविल्यानंतर गेल्या आठवड्यात प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्‍यांकडून शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी मागविली होती. यासाठी 21 तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

मात्र, 14 पैकी 12 तालुक्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या वेळेत दिली नव्हती. यामुळे या ठिकाणच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. दरम्यान, गुरूवारी दुपारपर्यंत सर्व तालुक्यांकडून आलेली माहिती एकत्र करून शिक्षण विभागाने सायंकाळी बदलीसाठी पात्र आणि बदलीचा अधिकार प्राप्त, यासह संवर्ग 1 आणि 2 मधील शिक्षकांची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द केली आहे.

या हरकतींवर आजपासून शिक्षकांना त्या त्या पंचायत समितीमध्ये हरकती घेता येणार आहेत. हरकती घेताना याबाबतचे पुरावे देखील सादर करावे लागणार आहेत. यासाठी 29 जुलै सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

त्यानंतर तालुकानिहाय आलेल्या हरकतींवर संबंधित गटशिक्षणाधिकारी कागदपत्रांच्या आधारे शहानिशा करून यादीत दुरूस्ती करून त्या दुरूस्तीच्या गोषवार्‍यासह पुन्हा ही तात्पूर्वी सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सादर करणार आहेत. त्यानंतर शिक्षण विभाग यादीची पुन्हा पडताळणी करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणार आहेत.

बदलीसाठी 1 हजार 593 शिक्षक पात्र

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून माहितीच्या आधारे तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी तयार केली आहे. यात 1 हजार 593 शिक्षक बदलीसाठी पात्र दिसत असून त्यात 1 हजार 166 बदलीपात्र शिक्षक असून 378 शिक्षक हे अवघड क्षेत्रात काम करत आहेत. तर 49 शिक्षक हे उर्दू माध्यमातील बदली पात्र शिक्षक आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com