बदल्या होऊनही शेवगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार ठाण मांडून

अवैध धंद्ये, अंतर्गत गटबाजीवरून विविध चर्चांना उधान
बदल्या होऊनही शेवगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार ठाण मांडून

बोधेगाव |प्रतिनिधी| Bodhegav

गेल्या महिन्यात नगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले. आहेत. यात शेवगाव पोलीस स्टेशनच्या 28 कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या झाल्या असल्या तरी यातील निम्मे कर्मचारी अजूनही याचा पोलीस ठाण्यात ठाण मांडून असल्याने. गटबाजी, वरकमाई यावरून शंका - कुशंका उपस्थित करून शहरात या चर्चेला उधाण आले आहे.

शेवगाव पोलीस स्टेशन कर्मचार्‍यांच्या अंतर्गत गटबाजीने पोखरले असून त्याचा दैनंदिन परिणाम कामकाजावर होत आहे. शहर व तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने सामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. परिणामी, सुरक्षिततेचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरू पहात आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निवडक पोलीस कर्मचार्‍यांना जवळ करत असल्याने अन्य कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर झाला आहे.

मागील महिन्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान शेवगावमध्ये उसळलेली दंगल पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण मानले जात आहे. हिंदू - मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी,यासाठी काही शक्ती कित्येक महिन्यापासून प्रयत्नशील असताना पोलिसांची डीबी ब्रँच व गुप्तवार्ता विभाग केवळ अंतर्गत गटबाजीत व्यक्त असल्याने त्यांना याबबात शेवटपर्यंत महिती समजली नसल्याचे बोलले जात आहे.

शेवगाव शहर व तालुक्यात सर्वच अवैध व्यवसायांनी मुसंडी मारली आहे. यातून पोलिसांना लाखोंची कमाई मिळते. कमाईनुसार त्या त्या भागात पोस्टींग मिळण्यासाठी अंतर्गत वाद सुरू आहेत. शेवगाव शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढता आहे. मात्र, अनेक गुन्हे रेकॉर्डर घेतले जात नाहीत. जुगार, मटका, मावा विक्री, लॉजमधून चालणारा अनैतिक व्यवसाय, अवैध दारू विक्री, वाळू, मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक या सर्वातून मोठी उलाढाल व कमिशन मिळत असल्याने बहूमांश बदली झालेले कर्मचार्‍यांना शेवगाव पोलीस ठाणे सोडवत नसल्याची चर्चा रंगली आहे. हे प्रकार थोपविण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे. यातच वरिष्ठ अधिकारी निवडक कर्मचार्‍यांना जवळ करत असल्याने अन्य कर्मचार्‍यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यातूनच अंतर्गत गटबाजीला बळ मिळाले असल्याचे एका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या बोलीवर सार्वमतशी बोलताना सांगितले. या प्रश्नी सत्ताधार्‍यांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून आहेत.

शेवगाव शहरात वाहतूक कोंडी कायम

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेवगाव शहरात चार वाहतूक पोलिसांच्या नेमणूका आहेत. मात्र, वर्दळीच्या एसटी स्टँड व आंबेडकर चौकात कोणीही पोलीस कर्मचारी थांबत नसल्याने वाहतुकीची कायम कोंडी होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com