बदली प्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता शिक्षकांची माहिती भरण्यास मुदतवाढ

बदली प्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता शिक्षकांची माहिती भरण्यास मुदतवाढ

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया 30 जूनपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना 20 जूनपर्यंत शिक्षकांनी आपली माहिती संकेतस्थळावरती पूर्ण करणे अपेक्षित होते. माहिती अपूर्ण राहिल्याने राज्य सरकारने 27 जूनपर्यंत शिक्षकांची माहिती भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या 30 जूननंतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने बदली प्रक्रिया संबंधी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे. बदली प्रक्रियेत समन्वय करण्यासाठी नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिल्या प्रकरणी कार्यवाही करावी तसेच अवघड क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहेत.

सन 2022 मधील बदल्या करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी असलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद/सॉफ्टवेअर कंपनी/कोणतीही संस्था यांना येणार्‍या अडचणींना योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करण्यासाठी राज्य समन्वयक सचिन ओंबासे भाप्रसे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा व विजय गौडा भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा, विभागीय समन्वयक संबंधित महसूल विभागाचे उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा समन्वयक संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक हे काम पाहणार आहेत.

मा. न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक बदलीस पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक असेल किवा नसेल मात्र, ज्या शिक्षकाची मा. न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिले असल्यास, अशा शिक्षकाची ऑफलाईनद्वारे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी बदली करावी. मा. न्यायालयाच्या बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असतील व तो बदलीस पात्र शिक्षक व बदली अधिकार पात्र शिक्षक हे बदलीसाठीच्या निकषांची पूर्तता करीत असल्यामुळे, या शिक्षकांचाच नियमानुसार ऑनलाईनद्वारे होणार्‍या सिस्टीममध्ये समावेश होत असल्यामुळे अशा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनद्वारे कराव्यात.

बदली पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नसेल अशा शिक्षकांचा सध्या विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरच्या सिस्टीममध्ये समावेश होऊ शकणार नाही. याकरिता सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठी 2 ते 3 आठवड्यांचा आणखी कालावधी लागेल असे सॉफ्टवेअर कंपनीने स्पष्ट केले आहे. सन 2022 या वर्षांतील बदल्या करण्यास आधीच विलंब झालेला असून मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आणखी विलंब करता येणार नाही. त्यामुळे बदलीस पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नाही मात्र, मा. न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रकरणे असल्यास, अशा शिक्षकांच्या बदल्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शेवटच्या टप्प्यात ऑफलाईनद्वारे कराव्यात.

अवघड क्षेत्र घोषित करणे:- आतापर्यंत दिनांक 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार घोषीत केलेल्या अवघड क्षेत्रानुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. करोना-19 च्या महामारीमुळे मागील 2021 या वर्षी बदल्या होऊ शकल्या नाहीत. सुधारित शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले नसावे. तसेच याच शासन निर्णयातील तरतुदीनुसार दर 03 वर्षांनी अवघड क्षेत्राचे पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्यामुळे दिनांक 7 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुधारित अवघड क्षेत्र घोषित करून, यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी व सुधारित यादी अपलोड करावी. जेणेकरून या वर्षीच्या बदल्या करताना पूर्वी अवघड क्षेत्रात 03 वर्षे काम केलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना पूर्वीची यादी सहज उपलब्ध होईल.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू असून त्याअंतर्गत शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीची (टप्पा-1) मुदत 20 जून रोजी संपुष्टात येत आहे. तथापि, सदर प्रणालीमध्ये आणखी बर्‍याच शिक्षकांची माहिती अद्ययावत करावयाची असल्याची बाब मे. विन्सोस आयटी कंपनीने निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे सदर कार्यवाहीस दिनांक 27 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून काही काळ जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com