रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत

रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत

पुणतांबा (वार्ताहर) / Puntamba - राहाता तालुक्यातील जळगाव जवळील रेल्वे चौकीजवळ असलेल्या भुयारी पुलाखाली 3 फुटापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे या पुलाखालून जळगाव-गोंडेगाव यासह अनेक गावांसाठी जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र चीड निर्माण झाली आहे.

रेल्वे खात्याच्या धोरणानुसार दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर रेल्वे फाटकाजवळ ठिकठिकाणी भुयारी पुलाची कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झाली आहेत. जळगाव चौकी येथील भुयारी पुलाचे काम दोन वर्षापूर्वीच सुरु झाले होते. मात्र पावसाळ्यात पुलाखाली पाणी जमा झाल्यास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. याचा अनुभव परिसरातील ग्रामस्थाना मागील दोन पावसाळ्यात आला होता.

याबाबत ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. त्यानुसार रेल्वे खात्याने भुयारी पुलाखाली पावसाळयात जमा होणार्‍या पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराने फेबुवारीपासूनच काम सुरु केले होते मात्र अजूनही काम पूर्ण न झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात पुलाखाली पाणी जमा झाल्यामुळे या पुलाखालून परिसरातून जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

त्यामुळे पावसाळ्यात या पुलाखाली जमा होणार्‍या पावसाची तातडीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था रेल्वे खात्याने करावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण चव्हाण यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com