
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - लॉकडाऊनच्य तिसर्या टप्प्यात शासनाने करोनाचे नियम शिथील करून दुकाने उघडण्यास परवानगी दिली असताना शहरात या नियमांना हरताळ फासला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुकानदार, ग्राहक तसेच नागरिक नियमांची पायमल्ली करत असून या गर्दीला आळा घालण्यास कुठल्याच प्रशासनाला यश आलेले नाही. रस्त्यांवरील बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक ठप्प झालेली पहायला मिळाली.
करोनाच्या दुसर्या लाटेत अनेकांचा बळी गेला. शेकडो जण करोनाबाधित झाले. बाधितांची संख्या कमी झाल्याने नियम व अटी शिथिल करत शासनाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे प्रारंभीच्या काही दिवस गर्दी आटोक्यात होती. आता मात्र सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. काल तर गर्दीने उच्चांक केला. गर्दीमुळे शिवाजी रोड व मेनरोडवर अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली होती.
या रस्त्यांवर वाहने आडवी तिडवी लावून वाहनमालक खरेदीसाठी जात असतात. त्यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. शहरात तर वाहतूक शाखा बरखास्त झाल्यामुळे वाहतूक पोलीस गायब झाले आहे. कुठेच दिसत नाहीत. यामुळे वाहतुकीचे नियंत्रण पूर्णपणे कोलमडले गेले आहे. शिवाजीरोड व मेनरोडला वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक ठप्प होणार नाही, असे नियोजन करावे. कोणत्याही व्यावसायिकांना त्रास होणार नाही असे नियोजन केले तरच शहरातील वाहतुकीला शिस्त लागू शकेल.
शहरातील अनेक भागातील भाजी विक्रेत्यांवर कोणाचा धाक राहिलेला नाही. सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत विक्रेते दुकाने थाटून बसलेली असतात. सकाळच्या वेळी त्यांच्याकडेही मोठी गर्दी होते. पहाटे मार्केट यार्डवरही तिच परिस्थिती पहायला मिळतेे. अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवलेले नाही, दुकानातील कामगारांना मास्क नाही, सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. गर्दीतही कोणी या नियमांचे पालन करताना दिसत नाही. यामुळे पुन्हा करोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका, महसूल तसेच पोलीस प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने त्यांचा कोणाला धाक राहिला नाही. त्यामुळे गर्दीचा पोळा फुटल्याचे चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे.