
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बाजारपेठेत व्यापार्याला भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणार्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इम्रान अल्ताब खान उर्फ बाबला असे त्याचे नाव आहे. त्याने 30 सप्टेंबर रोजी व्यापारी सुमीत किरण सोनग्रा (वय 35 रा. विराज कॉलनी, डीएसपीचौक, नगर) यांना धमकी दिली होती.
याप्रकरणी सोनग्रा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 30 सप्टेंबर रोजी सोनग्रा हे त्यांच्या मालकीच्या शु मॅक्स नावाच्या चप्पल व बुटाच्या दुकानात असताना इम्रान अल्ताब खान उर्फ बाबला हा तेथे नवीन बूट घेण्यासाठी आला होता. बुटाच्या किंमतीवरून सोनग्रा यांच्याशी वादविवाद करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळून गेला आहे.
सदर तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना त्याचा शोध घेणेकामी कोठला परिसरात पाठविले. गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ कोठला परीसरात जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शितल मुगडे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, अभय कदम, संदीप थोरात, तेहसिन शेख, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ केकाण यांच्या पथकाने केली आहे.