व्यापार्‍याची सुमारे तीन लाखांची रक्कम लांबविली

तारकपूर परिसरातील घटना || तोफखान्यात गुन्हा
Crime news
Crime news

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या व्यापार्‍याकडील सुमारे तीन ते साडेतीन लाख रूपयांची रोख रक्कम दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केली. पत्रकार चौक ते तारकपूर बस स्थानकाकडे जाणार्‍या रोडवर मंगळवारी रात्री 9.25 वाजता ही घटना घडली.

या प्रकरणी व्यापारी सुनील लालचंद सिरवानी (वय 41 रा. सिंधी कॉलनी, तारकपूर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखीविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरवानी यांची दाळ मंडईमध्ये खाद्य तेलाचे, दाळीचे व तांदुळाची बी.जी.आर. ट्रेडिंग कंपनी आहे. सिरवानी यांनी दोन दिवसात धंद्यातून जमा झालेली रोख रक्कम एका बॅगमध्ये भरली होती. सदरची रक्कम तीन ते साडेतीन लाख होती. रक्कम असलेली बॅग सिरवानी यांनी त्यांच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. ते त्यांची बी.जी.ट्रेडिंग कंपनी बंद करून रात्री घराकडे जाण्यासाठी निघाले.

दरम्यान सिरवानी हे पत्रकार चौक ते तारकपूर जाणार्‍या रस्त्यावरून जात असताना मराठा मंदिर सायकल सेंटरच्या समोर पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी सिरवानी यांच्या दुचाकीचा कट मारून खाली पाडले. त्यातील एकाने सिरवानी यांना बाजूला धरून ठेवले तर दुसर्‍याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पैशाची बॅग ताब्यात घेतली. ते दोघे चोरटे डीएसपी चौकाच्या दिशेने वेगात निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सिरवानी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com