मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून प्लॉटची खरेदी

व्यापार्‍याची 44 लाखांची फसवणूक || सहा जणांविरूध्द गुन्हा
मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून प्लॉटची खरेदी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट कागदपत्रे तयार करून मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून प्लॉटची परस्पर खरेदी करत व्यापार्‍याची 44 लाख 35 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रामेश्वर बालुराम कलवार (वय 62 मु. रा. सोसर सदन, चैतन्य नगर, प्रोफेसर कॉलनी, सावेडी, हल्ली रा. विमाननगर, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुवेंद्र संतोष डाबी (रा. सौरभ कॉलनी, सुरज कॉम्प्लेक्स, राघवेंद्रस्वामी मंदीर जवळ, बोल्हेगाव), फिर्यादीच्या वडीलांच्या जागी उभा केलेला तोतया इसम, तसेच लिहून देणारा व लिहून घेणारा यांना व्यक्ती ओळख देणारे साक्षीदार निल शरद कांबळे (रा. कांबळे वाडा, चितळे रोड), मोहन अशोक वाटमारे (रा. शिवाजी नगर, अहमदनगर) व खरेदीखताचे ड्राफवर सही करणारे साक्षीदार अनिरूध्द सुभाष पाटील (रा. नालेगाव) व अक्षय राकेश ओस्वाल (रा. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

नालेगाव येथे स.नं. 17/4 मधील प्लॉट नं 1 चे क्षेत्र 1584.00 चौ.मी. हा प्लॉट फिर्यादीचे वडील बालुराम रघुनाथ कलवार यांनी सन 1997 मध्ये खरेदीखत दस्त क्र. 3474/1997 प्रमाणे प्रविणकुमार पोपटलाल कटारीया यांचेकडून खरेदी केला होता. 7/12 उतार्‍यावर फिर्यादीच्या वडीलांचे नाव होते. वडील हयात असताना त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार सदर प्लॉट मिळकत ही मृत्यूपत्र दस्त क्र. 6027/2009 अन्वये 18 डिसेंबर, 2009 मध्ये फिर्यादीच्या नावे लिहून ठेवले होते. त्यांच्या वडिलांचा 26 मे, 2019 रोजी मृत्यू झाला.

वडील मयत झाल्यानंतर सदरचा प्लॉट हा मृत्युपत्राप्रमाणे फिर्यादीच्या मालकीचा आहे. दरम्यान फिर्यादीने 3 मार्च, 2023 रोजी तलाठी कार्यालय नालेगाव येथे प्लॉटचा कर भरण्यासाठी व सदर प्लॉट हा नावे नोंद करण्यासाठी प्रल्हाद राय पुरोहित (रा. सोसर सदन, चैतन्य नगर, प्रोफेसर कॉलनी, सावेडी) यांना पाठविले होते. त्यावेळी प्लॉटच्या 7/12 उतार्‍यावर सुवेंद्र संतोष डाबी यांच्या नावाची नोंद फेरफार क्र. 23505 प्रमाणे झाली असल्याचे समजले.

फिर्यादीने फेरफार क्र. 23505 ची पाहणी केली असता सदर प्लॉट हा सुवेंद्र संतोष डाबी यांनी खरेदीखत दस्त क्र 97/2023 4 जानेवारी, 2023 प्रमाणे खरेदी केल्याचे दिसून आले. सुवेंद्र संतोष डाबी या इसमाने फिर्यादीचे वडील सन 2019 मध्ये मयत झालेले असताना देखील त्यांच्या जागी अज्ञात तोतया इसम उभा करून त्यांच्या वडीलांचे नावावर असलेला प्लॉट हा परस्पर खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com