ऑक्सिजन पुरवठ्यात लूट, आयएमएने थोपटले दंड

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : गुन्हे दाखल करण्याची मागणी
ऑक्सिजन पुरवठ्यात लूट, आयएमएने थोपटले दंड

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करताना व्यापार्‍यांकडून

जादा किंमत आकारण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सध्याच्या करोना महामारीच्या काळात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करताना लुटालूट करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकाळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, त्यातच ऑक्सिजन पुरवठा करणारे व्यापारी खासगी रुग्णालयांकडून जादा दर आकारून त्यांची लूट करीत असल्याची तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी केली आहे. संघटनेने याबाबत निवेदनच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

सरकारी आदेशाप्रमाणे ऑक्सिजनची किंमत प्रती घनमीटरसाठी साधारणपणे 25 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ऑक्सिजनच्या एका जंबो सिलेंडरची कमाल किंमत ही 180 रुपये अधिक जीएसटी एवढी आकारणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र कोविड व नॉन कोविड रुग्णालयांना प्रत्येक जम्बो सिलेंडरमागे सातशे ते एक हजार रुपये रिफिलिंगचे आकारण्यात येतात. एवढी किंमत मोजून सुद्धा जम्बो सिंलेडर हे पूर्णपणे भरलेले नसतात. तरी अशा महामारीच्या काळात अशी लुटालूट करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. महामारीच्या काळात अशी लुटालूट करणार्‍या व्यापार्‍यांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे, असेही इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. तसे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना देऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com