व्यापार्‍यांना मारहाण करणार्‍यांविरुध्द कारवाई

शिरसगाव आठवडे बाजार पूर्ववत
व्यापार्‍यांना मारहाण करणार्‍यांविरुध्द कारवाई

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील आठवडे बाजार कालपासून पूर्ववत सुरू करण्यात आला. मागील आठवड्यात गावातील स्थानिक नागरिकांकडून बाजारामध्ये धुडगूस घालण्यात आला होता. या घटनेनंतर व्यापार्‍यांनी कारवाईच्या मागणीसाठी इशारा देत बाजार बंद ठेवला होता. पोलीस प्रशासनाच्यावतीने संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना जेरबंद करत कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रशासनाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. यापुढे असे प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या ठिकाणी दर मंगळवारी पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, प्रशांत बारशे, संतोष दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, प्रवीण कांबळे आदी कर्मचारी लक्ष ठेवणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे बाजार पूर्ववत सुरू झाल्याने परिसरातील सर्व शेतकरी, व्यापारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आबासाहेब गवारे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी बी. एस. म्हस्के यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com