ट्रॅक्टर शोरूममध्ये तोडफोड करत अडीच लाखासह पाच तोळे लांबविले

कायनेटिक चौकात चौघांची दहशत || गुन्हा दाखल
ट्रॅक्टर शोरूममध्ये तोडफोड करत अडीच लाखासह पाच तोळे लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ट्रॅक्टरचे जुगाड दिले नाही म्हणून शोरूममध्ये तोडफोड करत काऊंटरवरील अडीच लाख रूपये व पाच तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना गुरूवारी दुपारी कायनेटीक चौकात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यु हॉलंड ट्रॅक्टर शोरूमचे मॅनेजर संदीप रामभाऊ भनगे (वय 38 रा. एकविराचौक, सावेडी, मुळ रा. भानसहिवरा ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे.

भिमराज साहेबराव आजबे (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड), दिलीप लाळगे (पूर्ण नाव माहिती नाही) व दोन अनोळखी यांच्याविरूध्द भादंवि कलम 327, 427, 504, 506, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमराज आजबे याने न्यु हॉलंड ट्रॅक्टर शोरूममधून ट्रॅक्टर खरेदी केले आहे. तो गुरूवारी सकाळी शोरूममध्ये आला. त्याने ट्रॅक्टरसाठी लागणार्‍या जुगाडाची मागणी केली. भनगे यांनी त्याला आमच्याकडे जुगाड मिळत नसल्याचे सांगितले.

तेव्हा त्याने अरेरावी करत,‘तु जर मला जुगाड दिले नाही तर मी तुला सोडणार नाही’, असे म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली. भनगे याने त्याची समजूत काढून त्याला शोरूमच्या बाहेर काढून दिले. दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान आजबे, दिलीप लाळगे व इतर दोन अनोळखी शोरूममध्ये आले. त्यांनी शोरूमच्या मालकाचा पुतण्या शिवराज सुनील कर्डिले याला शोरूममधील प्रिंटर उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. यात शिवराज जखमी झाले आहे.

दरम्यान वरील चौघांनी शोरूममध्ये प्रिंटरची तोडफोड करत काऊंटरवरील अडीच लाख रूपये व शिवराज कर्डिले यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन लंपास केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com