ट्रॅकिंग फोर्समध्ये घुसला करोना; एकजण बाधित
सार्वमत

ट्रॅकिंग फोर्समध्ये घुसला करोना; एकजण बाधित

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

प्रतिबंधात्मक क्षेत्रातून ड्युटीवर येणे जाणे केल्यामुळे शहर ट्रॅकिंग फोर्सच्या एका कर्मचार्‍यास करोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या एक कर्मचार्‍याचा करोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील संपूर्ण ट्रॅकिंग फोर्स ठप्प झाले आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आले आहे. असे असतानाही शहरात कार्यरत असणार्‍या ट्रॅकिंग फोर्सच्या वाहनावरील एक पोलीस कर्मचारी ड्युटीवर येत होता.

त्यांना सुट्टी न मिळल्याने दररोज ड्युटीवर येणे भाग पडले. काही दिवसानंतर या कर्मचार्‍यास त्रास होऊ लागल्याने स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील इतर कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईनमधील एकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे ट्रॅकिंग फोर्सचे दोन कर्मचारी करोना बाधित झाले आहेत.

दरम्यान, शहरात पेट्रोलिंगचे काम करणार्‍या ट्रॅकिंग फोर्समध्ये एकूण 12 कर्मचारी कार्यरत आहेत. एकावेळी निम्मे कर्मचारी ड्यूटीवर असतात. त्यांना 24 तासांची ड्यूटी असते. या कर्मचार्‍यांना पेट्रोलिंगसाठी एक वाहन कार्यरत आहे. या वाहनावरील चालकच करोना पॉझिटिव्ह आल्याने व दुसर्‍या दिवशी याच वाहनातून इतरांनी प्रवास केल्याने सर्वच ट्रॅकिंग फोर्सचे कर्मचारी क्वारंटाईन केले आहेत. यामुळे शहरातील ट्रॅकिंग फोर्स ठप्प झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com