विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

केडगावातील घटना || पतीसह तिघांविरूध्द कोतवालीत गुन्हा
विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेने विषारी औषध प्राशन करत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना विवाहितेचा मृत्यू झाला आहे. पुनम निलेश नांदुरकर (वय 31 रा. दुधसागर सोसायटी, केडगाव, अहमदनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, भाची आणि विवाहितेच्या पतीचा मित्र यांच्याविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती निलेश अरूण नांदुरकर, भाची ऋतुजा मोहन नांगरे आणि शुभम बाजीराव दळवी (सर्व रा. केडगाव, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मयत पुनमचा भाऊ अमोल कांतीलाल माळवे (वय 38 रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. सन 2009 साली पुनम हिचा विवाह निलेश नांदुरकर याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. तसेच पुनमची भाची ऋतुजा नांगरे ही लहानपणापासून त्यांच्याकडे राहायला आहे. शुभम दळवी हा त्यांच्या शेजारी राहायला असून तो निलेश नांदुरकर याचा मित्र आहे. शुभम सोबत मयत पूनमचे संबंध असल्याचे ऋतुजा हिने निलेशला सांगितले होते. ऋतुजाच्या सांगण्यावरून निलेश हा पूनमला वारंवार मारहाण तसेच शिवीगाळ करून त्रास देत होता.

पती निलेश त्रास देत असल्याने पुनम हिने तिचा भाऊ अमोल माळवे याला सर्व सांगितले होते. अमोल यांनी निलेशला अनेक वेळेस समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र तो पूनमला वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पूनमने शनिवार (दि. 28) सायंकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पूनम यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

पती निलेश हा शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्याने तसेच शुभम हा इच्छा नसतानाही तिच्याशी जवळीक साधून त्रास देत असल्याने पुनमने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com