पर्यटकांना लागले काजवा महोत्सवाचे वेध

वनविभाग व पोलीस विभागाची आढावा बैठक
पर्यटकांना लागले काजवा महोत्सवाचे वेध

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळणार असून तोबा गर्दी होणार आहे. महोत्सवासाठी अगोदरच बुकींग करण्यात आल्या आहेत.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणार्‍या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा किटक कोट्यवधींच्या संख्येने एकाच वेळेस लयबद्ध पद्धतीने चमकत असतात. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी 25 मे ते 15 जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदर्‍यात दाखल होत असतात.

याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरू होण्याची शक्यता असुन अनेक पर्यटकांनी आपल्याला काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित बघता यावा म्हणून टेन्टधारक व हॉटेलमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकींग केली आहे. काही ऑर्गनायझर्सनी काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरु असून पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. भंडारदऱा धरण परिसरातील हॉटेल व्यावसायिक, सुशिक्षीत बेरोजगार तरुण, गाईड व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत.

अनेक टेंटधारकही आकर्षक दरात काजवा बुकींग करत आहेत. मागील दोन तीन वर्षांपूर्वी करोना या विषाणूजन्य रोगामुळे काजवा महोत्सवावर विपरीत परिणाम होऊन आदिवासी युवकांचा रोजगार थांबला गेला होता; मात्र गतवर्षापासून पुन्हा काजवा महोत्सव जोमाने सुरू झाला आहे. यावर्षी मात्र भंडारदर्‍याचा काजवा महोत्सव हाऊसफुल्ल होणार आहे.

यंदा काजवा महोत्सवासाठी तोबा गर्दी होणार असल्याने रात्री साडेनऊ नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नसून दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही तर ठिकठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

- गणेश रणदिवे (सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी वन्यजीव वनविभाग नाशिक)

पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. मद्यपान करून धांगडधिंगा करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

- गणेश इंगळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक राजूर पोलीस स्टेशन)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com