500 पर्यटकांची आनंददरीत स्वच्छता मोहीम

ट्रेककॅम्पचा पुढाकार || अनेक शिक्षण संस्थांचा सहभाग || तरुणांचा उत्साह लक्षणीय
500 पर्यटकांची आनंददरीत स्वच्छता मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त डोंगरगण येथील आनंददरीत पर्यटकांनी ट्रेकिंगचा आंनंद घेत असतानाच सामाजिक बांधिलकी जपली. सुमारे 500 पेक्षा जास्त पर्यटकांनी दरीत स्वच्छता मोहीम राबवत तेथील प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला. ट्रेककॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला.

या वेळी उद्योजक गौरव फिरोदिया, अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, पेमराज सारडा कॉलेजच्या प्रा. भक्ती क्षीरसागर, आयएसडीटी कॉलेजच्या प्रा. पूजा देशमुख, जे. जे. अ‍ॅकेडमीचे प्रा. के. के. झा, माऊंट लिटेरा झी स्कूलच्या स्वाती कानडे आदी या वेळी उपस्थित होते.

नगरपासून जवळच असलेल्या डोंगरगण येथील आनंददरी पर्यटकांसाठी आवडतं ठिकाण आहे. मात्र, अनेकजण तेथे आपल्याजवळील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आदी कचरा टाकत असतात. त्यामुळेच या दरीत प्लॉगिंग ड्राईव्ह ही मोहीम राबविण्याची कल्पना ट्रेककॅम्पचे संस्थापक लाहोटी यांच्या मनात आली. त्यानुसार प्लॉगिंग ड्राईव्हची संकल्पना पुढे आली. आनंददरीत राबविण्यात आलेली ही तिसरी मोहीम होती. जागतिक स्वच्छता दिनी सकाळीच पर्यटक वांबोरी घाटात पोहोचले. तेथून मोहिमेस प्रारंभ झाला.

या निसर्गरम्य स्थळाचा आनंद घेत पर्यटकांनी तेथे पडलेल्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, रॅपर गोळा केले. या वेळी सुमारे 40 गोण्या कचरा गोळा झाला. हा सर्व कचरा नगरमध्ये आणून डिस्पोज करण्याची जबाबदारी सर्व अ‍ॅपने घेतली होती. अहमदनगर पोलीस दलाने पर्यटकांसाठी वाहनांची व्यवस्था केली होती. मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी चुलीवरच्या कॉफीचा आनंद घेतला.

आफ्रिकेत झालेली 90 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या राजेंद्र पालवे यांचा, तसेच सातारा येथे झालेल्या 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या श्रेयांस गांधी व प्रांजल गांधी यांचा सत्कार या वेळी गौरव फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. शर्वरी मुळे यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण मोहिमेत ट्रॅकॅम्पच्या स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.

11 डिसेेंबरला ट्रेकॅथॉन

11 डिसेंबर हा दिवस वर्ल्ड माऊंटन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अहमदनगर सायकलिंग क्लबने ट्रेकॅम्पसोबत ट्रेकॅथॉन 2022चे आयोजन केले आहे. प्रथमच होणार्‍या या उपक्रमाची घोषणा उद्योजक गौरव फिरोदिया यांनी केली. या वेळी बालकांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com