पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी नगर जिल्ह्याची साद

माध्यमांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजवावी - ना. विखे पाटील
पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी नगर जिल्ह्याची साद

लोणी |प्रतिनिधी| Loni

जिल्ह्याकडे आजपर्यंत फक्त राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी नगर जिल्हा सर्वांना साद घालत आहे. माध्यमांनी या विकास प्रक्रीयेत सहभागी होऊन मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्यावतीने माध्यम प्रतिनिधींशी स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री ना.विखे पाटील यांनी सविस्तर भाष्य करून, जिल्ह्याच्या तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यातील बाबींचे सविस्तर विवेचन केले.

याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, शिवाजीराव गोंदकर, डॉ.भास्करराव खर्डे, भगवती माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब जपे उपस्थित होते. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा मोठा असला तरी प्रत्येक तालुक्यात असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून, विकासात्मक प्रक्रीया साध्य होऊ शकते यासाठीच आपला प्रयत्न आहे. विकास आराखड्याच्या बाबतीत आपण सर्वांच्याच अभ्यासपूर्ण सूचना मागवित असून, त्यानुसारच जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन परिपूर्ण होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले, औद्योगिक वसाहतींमधील समस्यांचे गांभिर्य मोठे असले तरी, यामध्ये सुधारणेला वाव आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सर्व उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीही या निमित्ताने प्रयत्न होतील. राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आता निर्माण होत असल्यामुळे दळणवळण सोयीस्कर होत आहे. उपलब्ध असलेल्या जमिनींवर स्वतंत्र आयटीपार्क, कृषी प्रक्रीया उद्योग उभारले गेले तर, या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तिर्थस्थान आहेत, तिर्थक्षेत्र पर्यटन हा सुध्दा विकासाच्या प्रक्रीयेचा एक भाग होऊ शकतो. जिल्ह्यात श्रध्दा स्थानांकडे येणार्‍या भाविकांची संख्या पाहता या तिर्थक्षेत्रांच्या विकासाचे नियोजन झाले तर, त्या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळून स्थैर्यही मिळू शकते. याकडे लक्ष वेधून अकोले तालुक्यात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने ट्रेकर येतात. या भागातही रोजगार उपलब्धतेच्या मोठ्या संधी आहेत. परंतु या भागातील तरुणांनीही पुढे येऊन या विकास प्रक्रीयेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक भूमीपुत्र देशात आणि परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन काय करता येईल अशा सुचनाही आपण त्यांच्याकडून मागवत आहोत. हे सर्व भूमीपुत्र एकत्र आले तर विकासाचा नवा प्लॅटफॉर्म तयार होऊ शकेल. या विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमांची भूमिकाही आमच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आपणही या विकास प्रक्रीयेचे भागीदार व्हा, अशी इच्छा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र सलालकर यांनी केले.

पालकमंत्री पद नगर जिल्ह्याकडे आल्याने प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची मोठी संधी मिळाली आहे. तसे प्रयत्नही सुरू झाले आहेत. परंतु सामाजिक जबाबदार्‍याही वाढत आहेत. जिल्ह्यामध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांचे गांभिर्य माध्यमांनी ओळखून याबाबत जागृती करण्यासाठी पुढे यावे.

- खासदार डॉ. सुजय विखे पाटील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com