दोन मुली झाल्या म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्या

नेवाशातील कारेगावची घटना || पतीसह सासू सासर्‍यांवर गुन्हा
दोन मुली झाल्या म्हणून छळ; विवाहितेची आत्महत्या

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

दोन्ही मुली झाल्या म्हणून विवाहितेचा छळ करून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना तालुक्यातील कारेगाव येथे घडली. याबाबत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती व सासू-सासर्‍यांवर हुंड्यासाठी छळ तसेच छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विवाहितेचे वडील विठ्ठल भाऊराव भोसले (वय 57) धंदा-शेती रा.वांबोरी, ता. राहुरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझी मुलगी राजश्री हिचे 27 मे 2015 रोजी कारेगाव ता. नेवासा येथील राहणारे रामनाथ एकनाथ घोडके यांचा मुलगा अंकुश रामनाथ घोडके याच्यासोबत लग्न झालेले असून तिला आता दोन मुली नामे आराध्या व ओवी अशा दोन मुली असून ते सर्वजण कारेगाव ता. नेवासा येथे राहत असतात.

25 जुलै 2017 रोजी राजश्री हिला पहिली मुलगी आराध्या ही झाली. त्यानंतर माझी मुलगी राजश्री हिला पहिली मुलगी झाली म्हणून डिलव्हरीच्या चार ते पाच महिन्यानंतर तिच्या सासरचे लोक सासरे रामनाथ, सासू लता, पती अंकुश त्रास द्यायला लागले. नवरा अंकुश हा तिला मुलीला जन्म दिला म्हणून कायमच मारहाण करुन त्रास देऊ लागला त्यावेळी माझी मुलगी राजश्री हिने आम्हांला सांगितले त्यावेळी आम्ही तिच्या सासरच्या लोकांची समजूत काढायचो त्यावेळी ते आम्हाला सांगायचे की, नाही आम्ही कसलाही त्रास देत नाही तुम्ही काळजी करु नका 2020 मध्ये तिला पुन्हा दुसरी मुलगी ओवी ही झाली त्यानंतरच्या डिलेव्हरी नंतर तिला तिच्या सासरचे लोक अधिकच त्रास देऊ लागले.

27 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 05.00 वाजण्याच्या सुमारास व्याही रामनाथ यांचा फोन आला की तुम्ही लवकर या. आम्ही सर्वजण मुलगी राजश्री हिच्या घरी कारेगाव येथे गेलो असता, मुलगी राजशी ही हॉलमध्ये चटईवर झोपलेली दिसली व तिच्या अंगातोंडावर चादर टाकलेली होती त्यावेळी मुलगी राजश्री हिच्या घरी कोणीच नव्हते ती एकटीच घरामध्ये झोपलेल्या अवस्थेत दिसली. म्हणुन आम्ही तिच्या तोंडावरची काढली त्यावेळी तिचे डोळे उघडे दिसले व तिची काहीच हालचाल चालू नव्हती. त्यावरुन आम्हांला समजले की आमची मुलगी राजशी ही मयत झालेली आहे.

त्यानंतर आम्ही नेवासा पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आलो असता, त्यावेळी आम्हाला समजले की पोलीस सुध्दा कारेगाव येथे गेलेले आहेत. त्यावेळी पोलिसांनी माझी मुलगी हिची डेथबॉडी अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये टाकुन तिच्यावर पी. एम. करणेसाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे घेऊन गेले तिच्यावर जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पी.एम केल्यानंतर आम्हाला समजले की, मुलगी राजश्री हिने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे तसेच ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे आम्हाला समजले.

26 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 रोजीचे पहाटेचे 5 वाजण्याच्या दरम्यान माझी मुलगी राजश्री हिने तिचे पती अंकुश रामनाथ घोडके, सासरा रामनाथ एकनाथ घोडके, सासू लताबाई रामनाथ घोडके रा. कारेगाव ता. नेवासा यांच्या सन 2017 पासूनच्या कायमच्या त्रासाला तसेच मारहाणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील तिघांवर भारतीय दंड विधान कलम 306, 498(अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करत आहेत.

सासरच्या घरी ट्रॅक्टर-कारची मोडतोड करून दारात अंत्यसंस्कार; वांबोरीतील माहेरच्या मंडळींवर गुन्हा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील कारेगाव येथे सासरच्या छळास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या मृत्यूची खबर कळताच घरी आलेल्या तिच्या माहेरच्या मंडळींनी ट्रॅक्टर व कारची मोडतोड करून नुकसान केले तसेच सासरच्या घरासमोर तिचे अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी विवाहितेच्या चुलत सासर्‍याच्या फिर्यादीवरून माहेरच्या मंडळींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत दिलीप एकनाथ घोडके (वय 43) रा. कारेगाव, ता.नेवासा यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, माझा भाऊ रामनाथ हा त्याची पत्नी लताबाई, मुलगा अंकुश व सून राजश्री, नात आराध्या व ओवी यांच्यासह आमच्या शेजारी राहात आहे. त्याचे घर माझ्या घरापासून 100 फुटावर आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माझी चुलत सुन राजश्री हिचे वडील विठ्ठल भाऊराव भोसले, भाऊ रविशंकर विठ्ठल भोसले, भाऊ महेश विठ्ठल भोसले, चुलतभाऊ सतिष भोसले, विजय भोसले सर्व रा. वांबोरी ता. राहुरी व इतर 8 ते 10 महिला-पुरुष यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आमच्या बोलेरो गाडीचे ट्रॅक्टरचे तसेच भाऊ रामनाथ घोडके याच्या घरामधील कपाटाच्या काचा फोडुन सामानाची उचकापाचक करुन नुकसान केले.

माझे चुलत जावई निवृत्ती शिंदे यांना उलटा कोयता डोक्यावर मारला व आमच्यावर दगड फेकले. एक दगड माझ्या पोटावर लागून मला जखमी केले तसेच सुनबाई राजश्री हिच्या प्रेताची भाऊ रामनाथ घोडके यांचे राहते घरासमोर चिता रचून अंत्यविधी करून प्रेताची विटंबना केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या फिर्यादीवरुन विठ्ठल भाऊराव भोसले, रविशंकर विठ्ठल भोसले, महेश विठ्ठल भोसले, दत्तात्रय बाळासाहेब भोसले, सतिष भोसले, विजय भोसले व ईतर 8 ते 10 महिला व पुरूष सर्व रा. वांबोरी ता. राहुरी यांच्याविरुध्द नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 258/2023 भारतीय दंड विधान कलम 143, 144, 149, 336, 324, 504, 506, 297,424 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com