प्रवासी महिलेवर पिकअप जीप चालकाकडून अत्याचार
सार्वमत

प्रवासी महिलेवर पिकअप जीप चालकाकडून अत्याचार

अवघ्या 12 तासात आरोपी जेरबंद

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

संगमनेर बायपास पुणे-नाशिक मार्गावरुन चाकण येथे जाण्यासाठी उभी असलेली महिला पिकअप जीपमध्ये बसून प्रवास करत असतांना जीपचालकाने तिला मारहाण करुन दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना 7 ऑगस्ट रोजी घडली. सदर घटनेबाबत घारगाव पोलीस ठाण्यात 14 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासात पोलिसांनी तपास करुन आरोपीस अटक केली आहे.

संगमनेर बायपास पुणे-नाशिक महामार्गावरुन चाकण येथे जाण्यासाठी उभी असलेली महिला एका पिक अप जिपमध्ये बसली. रात्री 9 ते 12 या दरम्यान नारायणगाव ता. जुन्नर भाजी मार्केट व परिसरात अनोळखी पिक अप जीप चालक वय अंदाजे 35 ते 40 याने जीपमध्येच सदर महिलेला अपमानास्पद वागणूक देत तिला मारहाण करुन बळजबरीने दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला. व तिला आळेफाटा ता. जुन्नर येथे सोडून दिले. याबाबत सदर महिलेने 14 ऑगस्ट रोजी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी फिर्यादी महिलेकडून घटनेची सखोल चौकशी केली. आरोपीचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेली पिक अप जीपची माहिती घेतली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केला. त्यानुसार सुखदेव बबन कंकराळे (वय 39, रा. मस्जीद जवळ, कोर्ट परिसर, बारगाव पिंपरी रोड, सिन्नर, जि. नाशिक) याने हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नगर पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार गाजरे, पोलीस हेड कॉस्टेबल विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, रवि सोनटक्के, बर्डे, भोपळे, बुधवंत, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस नाईक संतोष खेरे, किशोर लाड, विशाल कर्पे, सायबर सेल मधील पोलीस नाईक फुरकन शेख, आकाश बहीरट यांनी सदर आरोपीस नारायणगाव ता. जुन्नर येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com