तोफखान्याची ‘डिबी’ पुन्हा बरखास्त करण्याची नामुष्की

'हे' आहे कारण
तोफखान्याची ‘डिबी’ पुन्हा बरखास्त करण्याची नामुष्की

अहमदनगर|Ahmedagar

कायमच वादग्रस्त ठरलेली तोफखाना पोलीस ठाण्याची गुन्हे प्रगटीकरण शाखा (डिबी) बरखास्त करण्याची वेळ पुन्हा वरिष्ठांवर आली आहे. दोन दिवसापूर्वी डिबीमध्ये कार्यरत असलेला पोलीस हवालदार बार्शिकर काळे याला 10 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या लाचखोरीमुळे डिबी बरखास्त करण्यात आली आहे.

एप्रिलमध्येच नवीन डिबीची स्थापना करण्यात आली होती. एक महिना पूर्ण होत नाही तोच पुन्हा डिबी बरखास्त करण्यात आली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तसा आदेश पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिला होता. यानंतर डिबी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती निरीक्षक गायकवाड यांनी दिली.

मार्चमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात भेट दिली असता गुन्हे प्रगटीकरण शाखेचे कामकाज चव्हाट्यावर आले होते. त्यांनी तत्काळ निरीक्षक गायकवाड यांना डिबी बरखास्त करून टाकण्याचे आदेश दिले होते. यानंतर डिबी बरखास्त करण्यात आली होती. एप्रिलच्या सुरूवातील पुन्हा नव्याने डिबीची स्थापना करण्यात आली. सात कर्मचार्‍यांचा यात समावेश होता. डिबीचे प्रभारी मात्र जुनेच ठेवण्यात आले होते. डिबी स्थापन होऊन एक महिना होत नाही तोच हवालदाराने 10 हजाराची लाच घेतली. त्याने लाच घेतली आणि वरिष्ठांनी पुन्हा डिबी बरखास्त केली. आता नवीन डिबी स्थापन केली जाईल परंतू, या डिबीत कोणाला घ्यायचे हे शहर पोलीस उपअधीक्षक ठरविणार आहे. कायमच वादग्रस्त असलेल्या डिबीत नव्याने कोणाची नियुक्ती केली जाते याची उत्सुकता आहे.

‘यांची’ चौकशी होणार का ?

गुन्हे प्रगटीकरण शाखा नव्याने स्थापन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत हवालदार काळे याने 10 हजार रूपयांची लाच घेतली. दारू धंदा सुरू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून काळे याने तक्रारदाराकडून लाच घेतली होती. या लाचप्रकरणी डिबी प्रमुखांची चौकशी होणे आवश्यक आहे. प्रमुखांसह इतर कोणी यात सहभागी आहे का? याची चौकशी वरिष्ठांनी करणे आवश्यक आहे. फक्त डिबी बरखास्त करून यावर पांघरून टाकण्याचे काम वरिष्ठांकडून होताना दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com