
वीरगाव | वार्ताहर
एक-दोन महिन्यापूर्वी 150 ते 200 रुपये किलो या भावात विक्री झालेले टोमॅटो आता थेट 4 ते 6 रुपये किलो दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.एक महिन्यापूर्वी गगनाला भिडलेले बाजारभाव आता थेट मातीमोल झाल्याने टोमॅटो उत्पादकांची स्थिती हलाखीची बनली.
एप्रिलमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोला जूनपासून चढे बाजारभाव मिळण्यास सुरुवात झाली. हेच बाजारभाव अगदी ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत राहिले. त्यानंतर बाजारात टोमॅटोची आवक वाढली आणि दर घसरणीला लागले. एकरी एक ते दीड लाख रुपये खर्चून आता एका क्रेटचे 100 ते 150 रुपये मिळणेही मुश्किल झाले आहे. बाजारभावाचा आलेख इतका झटक्याने खाली आल्याने उत्पादन खर्चही आता फिटेनासा झाला. काही दिवसांपूर्वी टोमॅटो दर नियंत्रणासाठी थेट केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.काही राज्यात तर टोमॅटोचे रेशनिंग करण्याची वेळ आली. दर गडगडल्यानंतर मात्र ना केंद्राचा हस्तक्षेप असतो ना राज्य सरकारचा. अशा वेळी ही सरकारे कुठे जातात असा उद्विग्न सवाल शेतक-यांकडून आता विचारला जातो. निदान 300 रुपये क्रेट बाजारभाव मिळाल्यास झालेल्या खर्चाची तरी तोंडमिळवणी होण्याची शक्यता वाढते.
ऑगस्ट अखेरपासून टोमॅटोची आवक वाढली. त्यातच केंद्र सरकारने टोमॅटोची आयात केल्याने मागणीच्या तुलनेत आवक वाढून दर कोसळले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक टोमॅटोची आवक होत असल्याची माहिती मिळाली. पुणे, नारायणगाव,नाशिक बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरात मोठी घसरण होत आहे. मराठवाड्यातही स्थानिक बाजारपेठांत टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. मालाच्या ने-आणीचा वाहतूक खर्चही मिळत नसल्याने अनेकांनी फडातील तोडणी थांबविली.अनेक शेतकऱ्यांवर टोमॅटो जनावरांना घालण्याची वेळ आली.प्रतिकिलो हमाली, तोलाई, वाहतुक हे अनुषांगिक खर्च वजा जाता हातात काहीच पडत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. लाखोंची कमाई देणारे हे नगदी पिक आता मातीमोल झाल्याने सारेच टोमॅटो उत्पादक हैराण झाले आहेत.
भाजीपाला कोसळला
राज्यभरात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने विहीरींचे पाणी आटले.शेततळ्यांमधील पाणीही संपुष्टात आले. भाजीपाला पिकांना पाणी देणेही शक्य नसल्याने पीक घेणेच कठीण बनले आहे.रोपवाटीकांमधून शेतक-यांनी भाजीपाल्याची रोपे खरेदी केली. त्यावरचा लाखोंचा उत्पादन खर्चही केला. मात्र टोमॅटोसहित सिमला मिरची, दोडका, वांगी आणि इतरही भाजीपाला पिकांच्या दरात मोठी घसरण झाल्याने सारेच भाजीपाला उत्पादक हैराण झाले आहेत.