अखेर मुळाही ओव्हरफ्लो, नगरकरांची पाणी चिंता मिटली

अखेर मुळाही ओव्हरफ्लो, नगरकरांची पाणी चिंता मिटली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरणही काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाल्याने नगरकरांची रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता मिटली आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तेव्हा ही तिनही धरणं भरतील की नाही अशी शंका घेतली जात होती. पण गणराय येताना पाऊस घेऊन आले नी हा हा म्हणता तिनही धरणं तुडूंब झाली. तसेच जायकवाडीही 65 टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने ‘समन्यायी’चे संकटही आज दूर होत आहे.

अखेर मुळाही ओव्हरफ्लो, नगरकरांची पाणी चिंता मिटली
Video : रंधा फॉलचे विहंगम, नयनरम्य दृश्य

भंडारदरा धरण नेहमीप्रमाणे 15 ऑगस्टपर्यंत भरते. पण तसे घडले नाही. भंडारदरा भरले नसल्याने निळवंडेही रिकामे राहिले. मुळा धरणातही फारशी आवक झाली नाही. 1 सप्टेंबर रोजी भंडारदरा 84.86 टक्के, निळवंडे 76 टक्के, मुळा 73 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ही धरणं ओव्हरफ्लो होतील की नाही याबाबत शंका घेतली जात होती. पण गणरायाच्या आगमनाबरोबरच पाऊसही पाणलोटात दाखल झाला नी हा हा म्हणता नूर पालटला.

मागील पाच दिवसांपासून भंडारदरा व निळवंडे पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेही ओव्हरफ्लो झाले. रात्री 20611 क्युसेकनेे पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला या हंगामात पहिल्यांदा पूर आला.

इकडे मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित, कोतूळ भागात पावसाच्या सरी जोरदार कोसळत होत्या. त्यामुळे कोतूळ येथे काल दुपारी मुळा नदी 28398 क्युसेकने वाहती होती. धरणात होणारी आवक लक्षात घेता काल मुळा धरणात 24446 (94 टक्के) पाणीसाठा कायम ठेवून विसर्ग सोडण्यात आला. दुपारी 1075 क्युसेकने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले. जिल्ह्यातील छोटी धरणं खैरी (533) 100 टक्के, घा. पारगाव (437) शंभर टक्के भरली आहेत. तर सीना धरणातील पाणीसाठा (1916)80 टक्के, तर अकोलेतील आढळा (785) 70 टक्के भरले आहे. तत्पूर्वी अकोलेतील आंबित, पिंपळगाव खांड, वाकी ही छोटी धरणं तुंडब आहेत. दारणा, गंगापूर धरणंही ओव्हरफ्लो झाली असून गोदावरी, मुळा आणि प्रवरा, आढळा या नद्या वाहत्या असल्याने नदीकाठच्या गावांतील विहिरींचे पाणी वाढणार आहे.

धरणांच्या पाणीसाठ्यावरही नगर जिल्ह्यातील शेतकरी रब्बी पिकांचे नियोजन करीत असतात. मुळा, भंडारदरा, निळवंडे आणि कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे डिंभे तसेच वडज ओव्हरफ्लो झाले. घोड धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तसेच अन्य छोटी बहुतांश धरणं ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी राजाची शेतीच्या पाण्याची तसेच जनतेची पिण्याच्या चिंता दूर झाली आहे.

भंडारदराचे पाणी जायकवाडीत दाखल

भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडण्यात आल्याने अकोलेत प्रवरा नदीला पूर आला होता. आता हे पाणी कोल्हार, बेलापूर पार करीत रात्री पावणेनऊ वाजता नेवाशातील पाचेगावात पोहचले होते. तर रात्री उशीरा ते जायकवाडीच्या बॅकवॉटरध्ये दाखल झाले असल्याची माहिती आमच्या पाचेगाव वार्ताहराने दिली.

भंडारदरा पाणलोटात दोन दिवसांत 66 इंच पाऊस

भंडारदरा पाणलोटात 12 ते 14 सप्टेंबरच्या या दोन दिवसांत तब्बल 66 इंच पाऊस झाल्याची आकडेवारीवरून स्पष्ट होते.12 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत घाटघर 134, रतनवाडी 195, पांजरे 135, भंडारदरा 133, वाकी 123 असा एकूण 720 मिमी. 13 ते 14 सप्टेंबर सकाळपर्यंत घाटघर 205, रतनवाडी 212, पांजरे 185, भंडारदरा 179, वाकी 149 मिमी असा एकूण 930 मिमी. या दोन दिवसांत तब्बल 2023 दलघफू पाणी धरणांमध्ये दाखल झाले. यात मात्र पाणलोटातील आदिवासींचे प्रचंड नुकसान झाले आहे.

आज नाशिक, पुण्यात मुसळधार

आज राज्यातून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. फक्त नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com