तंबाखू, गुटख्याच्या मागणीसाठी 'या' कारागृहातील कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

तंबाखू, गुटख्याच्या मागणीसाठी 'या' कारागृहातील कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील तुरुंग अधिकार्‍यांनी कठोर भूमिका घेतल्याने कैद्यांना तंबाखू, गुटखा पुड्या मिळणे मुश्किल झाले आहे. या पुड्या मिळणे बंद झाल्याने वैतागलेल्या काही कैद्यांनी बुधवारी तब्बल पाच तास अन्नत्याग आंदोलन केले.

संगमनेर येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना खुलेआम विविध सुविधा उपलब्ध होत होत्या. तंबाखू, गुटखा पुड्या, पाण्याच्या बाटल्या, घरचे जेवण, मोबाईलची सुविधा सहज उपलब्ध होत होती. या कारागृहात सुरू असलेल्या कारणामुळे हे कारागृह चर्चेचा विषय बनले होते. याबाबत सातत्याने वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झाल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घातले. कारागृहात बंदोबस्तासाठी असलेल्या चार पोलिसांना निलंबितही करण्यात आले आहे. यामुळे कारागृह अधिकारी सतर्क झाले असून त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे कारागृहातील कैद्यांना सुविधा मिळणे बंद झाले आहे.

तंबाखू, गुटखा पुड्या मिळत नसल्याने वैतागलेल्या या कैद्यांनी पुड्याची मागणी केली. प्रयत्न करूनही त्यांना तंबाखू गुटख्याच्या पुड्या न मिळाल्याने यातील काहींनी दुपारचे जेवण घेतले नाही. बारा ते पाच या वेळेत या कैद्यांनी काहीच खाल्लं नाही. यावेळेत त्यांचा तुरुंगात गोंधळ सुरू होता.

तुरुंग अधिकारी भडकवाड यांना याबाबत माहिती समजताच ते कारागृहात आले. त्यांनी कैद्यांची चांगलीच कानउघाडणी करून कोणतीही वस्तू मिळणार नाही असे सुनावले. यानंतर कैद्यांचा नाईलाज झाला.

Related Stories

No stories found.