गैरव्यवहार दडपण्यासाठी संघाचे संचालक राष्ट्रवादीमध्ये

गैरव्यवहार दडपण्यासाठी संघाचे संचालक राष्ट्रवादीमध्ये

पाच लाखांची देणगी घेऊन आ. लंके यांनी केली भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका दूध संघाच्या संचालक मंडळावर 8 कोटी 30 लाखांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. तो गैरव्यवहार दडपण्यासाठी हे संचालक माजी आमदार कर्डिले यांना सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. या संचालकांनी तालुका दूध संघामार्फत 5 लाखांची देणगी भाळवणी कोविड सेंटर ला दिली असून त्या बदल्यात आमदार लंके यांनी भ्रष्टाचारी संचालकांची पाठराखण सुरू केली आहे, असा आरोप दूध संघाच्या कर्मचारी संघटनेचे तायगा शिंदे आणि गजानन खरपुडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी शिंदे म्हणाले, तालुका दूध संघ हा गैरव्यवहाराचा अड्डाच बनला आहे. 2005 ते 2007 या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळावर 2 कोटींचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा संघाच्या मालकीची जागा विकून नगर तालुक्याच्या वाट्याला 8 कोटी रुपये आले होते. पण आर्थिक ताळेबंदात अनेक घोटाळे घातल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी अधिकारी एन.डी. गोधेकर यांनी मार्च 2021 मध्ये विद्यमान संचालक मंडळा विरोधात 8 कोटी 30 लाखांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हे दाखल केलेले आहेत. पण राजकीय पाठबळामुळे अद्यापही त्या संचालकांना अटक झालेली नाही. विद्यमान संचालक मंडळ यांनी एमआयडीसी इमारत दुरुस्तीच्या नावाखाली 25 ते 30 लाखांच्या मशीनरी दुरुस्ती च्या नावाखाली 5 लाखांचा गैरव्यवहार केलेला आहे.

तसेच संचालक मंडळातील किसन बेरड, कैलास मते, वैशाली मते, मोहन तवले, राजाराम धामणे, पुष्पा कोठुळे, भाऊसाहेब काळे, बजरंग पडळकर यांनी ऍडव्हान्स च्या नावाखाली 23 लाख रुपये घेऊन अपहार केल्याचेही चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.यासह अनेक घोटाळे झालेले आहेत.त्यामुळे नगर तालुका दूध संघ हा गैरव्यवहार करण्याचा अड्डाच बनला आहे. विद्यमान संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार बाबत दाखल झालेले गुन्हे दडपण्यासाठीच 9 संचालकांनी माजी आमदार कर्डिले यांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेला आहे. पण सकृतदर्शनी ते राष्ट्रवादीमध्ये गेल्याचे दिसत असले तरी अंतर्गत हे सगळे कर्डिले यांच्या मर्जीतच आहेत.तालुका दूध संघात आर्थिक घोटाळे होत असताना तालुका दूध संघाचे 273 कर्मचार्‍यांना मात्र त्यांच्या हक्कांचे पैसे मिळालेले नाहीत. न्यायालयाने वेळोवेळी देणी देण्याबाबत सूचना केल्या असतानाही संचालक मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com