अकोले तालुक्यातील कालवा बाधित शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावू - ना.थोरात
सार्वमत

अकोले तालुक्यातील कालवा बाधित शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावू - ना.थोरात

कालव्यांच्या कामाला गती देण्यासाठी ना.थोरातांनी घेतली आढावा बैठक

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांच्या कामासाठी निधीची उपलब्धता सरकार करत आहे. आता तातडीने कालव्यांची कामे झाली पाहिजे. अकोले तालुक्यातील कालवा बाधित शेतकर्‍यांचे प्रश्न तातडीने सोडवून ही कालव्यांची कामे लवकर पूर्ण करा, अशी जलसंपदा विभागाला सूचना करून अकोले कालवाबाधित शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांचे प्रश्नही तातडीने मार्गी लावू, असे प्रतिपादन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शनिवारी संगमनेर येथील थोरात सहकारी साखर कारखाना विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीत अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे, मीनानाथ पांडे, मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिंदे, कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, गिरीष संघानी, श्रीमती संगीता जगताप, वाघमारे, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे, भूमीअभिलेख अधिकारी सूर्यवंशी, अकोले भूमीअभिलेख अधिकारी सोनवणे, पाटीलबुवा सावंत, भानुदास तिकडे, रवी मालुंजकर, सुभाष हासे, विकास बंगाळ, संतोष तिकांडे, दत्ता बंदावणे आदी हजर होते.

यावेळी ना.थोरात म्हणाले की, कालव्यासाठी कमीत कमी क्षेत्र वापरावे भूसंपादन करणे, घरे व पिकांचा मोबदला देणे, पाईपलाईन जोडणे, शिवारातील व मुख्य रस्त्यांवर नाल्यांवर पूल बांधणे, म्हाळादेवी व पिंपरकणे जलसेतू पूर्ण करणे, उताराचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करणे. कालव्यात जमिनी संपादित झालेल्या शेतकर्‍यांना पुनर्वसन दाखले देणे.

भूसंपादन झालेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी देणे. निळवंडे बॅक वॉटर मध्ये झालेले लिफ्ट चालू करणे. याबाबत जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येईल. जलसंपदा विभागाने अकोलेसह उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे,अशा सूचनाही यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.

आ. किरण लहामटे म्हणाले, निळवंडेचे कालवे लवकरात लवकर होण्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य असून अकोले तालुक्यातील कालवा बाधित शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावेत याचबरोबर आगामी काळात तालुक्यातील गोर गरिब शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल असेही ते म्हणाले.

मिनानाथ पांडे म्हणाले, मागील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी व शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कालव्यांंमध्ये बाधित होणार्‍या शेतकर्‍यांचे कोणतेही प्रश्न पूर्ण न करता घाई घाईने श्रेयासाठी कामे सुरू केली. अनेकांची उभी पिके उद्ध्वस्त करून जागोजागी खड्डे खोदून शेतकर्‍यांची गैरसोय केली. यातून काहीही साध्य झाले नाही. काम पूर्ण होण्यासाठी कायम महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात हेच सकारात्मक राहिले आहेत.

यावेळी अशोकराव भांगरे यांनी शेतकर्‍यांचे विविध प्रश्न मांडले. सकारात्मक चर्चा झाल्याने अकोले तालुक्यातील कालव्यांना गती मिळणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com